राजानंद मोरे, पुणेपुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) स्थिती सुधारण्यासाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाचा (बीएमटीसी) आदर्श घेतला जाणार आहे. त्यासाठी ‘पीएमपी’तील काही वरिष्ठ अधिकारी व सल्लागारांची टीम नुकतीच दोन्ही ठिकाणी जावून पाहणी करून आली. यामध्ये सर्वच बाबतीत ‘पीएमपी’ची बससेवा खूपच मागे असल्याचे आढळून आले. ‘पीएमपी’तील या त्रुटी दूर करण्यासाठी ‘बेस्ट’ व ‘बीएमटीसी’मधील चांगल्या बाबी टप्प्याटप्प्याने ‘पीएमपी’मध्ये आणल्या जाणार आहेत. शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असलेल्या आणि दररोज सुमारे १० लाख प्रवाशांना सेवा पुरविणाऱ्या ‘पीएमपी’ला झळाळी देण्यासाठी विविध पातळ््यांवर प्रयत्न केले जात आहेत. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी मागील चार महिन्यांपुर्वी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला काही प्रमाणात यशही मिळत आहे. सध्या ताफ्यातील जास्तीत जास्त गाड्या मार्गावर आणण्याबरोबरच रस्त्यावर बंद पडणाऱ्या बसचे प्रमाण, अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे मुख्य आव्हान आहे. तसेच अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्याबरोबच त्यांना चांगली सेवा देण्यासही प्राधान्य द्यावे लागणार आहे. यामध्ये गेलेल्या ‘बेस्ट’ आणि ‘बीएमटीसी’ची बससेवा नावाजली गेलेली आहे. त्यामुळे पीएमपीने दोन्ही सेवांचा प्रत्यक्ष अभ्यास करून त्यातील चांगल्या गोष्टी पीएमपीमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पीएमपीतील काही वरिष्ठ अधिकारी व सल्लागारांनी दोन्ही उपक्रमांना भेटी देवून पाहणी केली. संबंधित अधिकारी त्याचा अहवाल तयार करून पीएमपीमध्ये करावयाच्या सुधारणांचा लेखाजोखा मांडणार आहेत. बस, आगार, प्रवासी संख्या, कार्यशाळा, कुशल कर्मचारी, ब्रेकडाऊनचे प्रमाण, उत्पन्न, बसचा इंधन वापर अशा सर्वच मापदंडांमध्ये बेस्ट आणि बीएमटीसी पीएमपीपेक्षा खुपच पुढे आहेत. पुणे आणि बंगळुरूची लोकसंख्या जवळपास सारखी आहे. मात्र तरीही दोन्ही शहरांचा विचार केल्यास त्याठिकाणी बससंख्या अनुक्रमे सुमारे २२०० व ६५०० एवढी आहे. तर मुंबईत ४२०० बस रस्त्यावर धावतात. बससंख्या अधिक असल्याने प्रवासी संख्या तसेच उत्पन्नातही साहजिकच दोन्ही शहरे पुण्यापेक्षा आघाडीवर आहेत. योग्य व्यवस्थापन आणि देखभाल-दुरूस्तीची कामे वेगाने होत असल्याने दोन्ही शहरांमधील बसवाहतुक यशस्वी ठरल्याचे पीएमपीतील अधिकारी सांगतात. (प्रतिनिधी)
पीएमपी घेणार ‘बेस्ट, बीएमटीसी’चा आदर्श
By admin | Published: April 22, 2015 5:42 AM