पुणे :पुणे महापालिकेचा मिळकत कर दरवर्षी नियमितपणे भरणाऱ्या पुणेकरांना यावर्षी तब्बल १ कोटी रुपयांच्या बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. या बक्षिसांमध्ये पाच कारही असणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर पोलिस वसाहतीतील हुतात्मा शिरीष कुमार विद्यालयात मिळकतकर धारकांचा आज ( रविवार दि. २०) दुपारी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
महापालिकेकडून प्रथमच अशाप्रकारे प्रमाणिकपणे मिळकत कर भरणाऱ्या मिळकतकरधारकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येत आहे. ही लॉटरी ऑनलाइन असणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, कर संकलन विभाग प्रमुख अजित देशमुख उपस्थित राहणार आहेत.
बक्षिसांमध्ये ५ कारसह, १५ ई-बाईक, १० लॅपटॉप, १५ मोबाईल यांचाही समावेश आहे. लकी ड्रॉ मध्ये २५ हजारापेक्षा कमी कर असणारे, २५ ते ५० हजार कर असणारे तसेच ५० हजार पेक्षा पुढील कर भरणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. सध्या शहरात महापालिकेने दिलेल्या २ ऑगस्ट पूर्वीच्या मुदतीत कर भरणारे ७ लाख ६३ हजार मिळकतधारक आहेत.
सहा लाख मिळकत धारकांकडून कर वसुली बाकी-
एकीकडे महापालिका प्रामाणिकपणे मिळकत कर भरणाऱ्यांना बक्षीस वाटप करत आहे. त्याचवेळी शहरात तब्बल ६ लाख मिळकतधारकांकडून सुमारे अाठ हजार चारशे काेटी रुपयांहून अधिक थकबाकी वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर आहे. या थकबाकीदारांमध्ये व्यावसायिक आणि सरकारी मिळकतींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.शहरातील एकूण मिळकती - १४ लाखएकूण थकबाकीदार - ५ लाख ९८ हजार २२९थकीत रक्कम - ८ हजार ४३७ कोटीमिळकतकर भरणार्यांची संख्या (३१ जुलैपर्यंत) - ७ लाख ६२ हजार ५३९मिळकतकर भरणार्यांची एकूण रक्कम ( ३१ जुलैपर्यंत) - एक हजार २९६ कोटी