पुणे : स्थायी समितीच्या बैठकीत दाखल होणाऱ्या प्रत्येक विषयावर चर्चा, विरोध, वाद-विवाद, कधी पाठिंबा तर सदस्यांचे मतदान घेऊन बहुमताने विषयांना मान्यता दिली जाते. ही स्थायी समितीच्या बैठकीत वर्षोनुवर्षे चालत आलेली परंपरा मंगळवारी (दि.२२) मात्र मोडीत निघाली. कोणतीही चर्चा नाही की, कोणाचा विरोध नाही, अशा शांततामय वातावरणात अवघ्या तीन मिनिटांत १९ विषय मार्गी लागले. महापालिकेत प्रशासकराज सुरू झाल्यावर स्थायी समितीच्या बैठकीत, प्रशासक विक्रमकुमार यांनी एक नवा ‘विक्रम’ केला.
महापालिका सभागृहाची मुदत संपल्यावर, सर्वसाधारण सभेसह स्थायी समिती व विषय समित्यांचे सर्व अधिकार प्रशासक म्हणून विक्रमकुमार यांना मिळाले आहेत़ प्रशासक पदावर रूजू होताच कुमार यांनी, स्थायी समिती व विषय समित्यांच्या बैठकापूर्वीप्रमाणेच होतील, असे जाहीर केले़ यामध्ये प्रशासनाकडून दाखल झालेले विषय महापालिका आयुक्त म्हणून विक्रमकुमार यांच्या सहीने नगरविकास खात्याकडून स्थायी समितीसमोर आले़, तर प्रशासकांच्या भूमिकेत असलेल्या विक्रमकुमार यांना हे विषय आधीपासूनच माहीत असल्याने अवघ्या तीन मिनिटांत दाखल १९ विषय मार्गी लागले.
या १९ विषयांमध्ये स्थायी समितीला प्रशासनाकडून माहितीसाठी दाखल होणारे ७ विषय व ९ विषय विविध कामांच्या निविदांच्या मान्यतेसाठी सादर झाले होते़ यावर प्रशासकांच्या भूमिकेत असलेल्या कुमार यांनी मान्यता देऊन ते नगरसचिव कार्यालयाकडून पुन्हा आयुक्तांकडे अंमलबजावणीसाठी पाठविले़ विषयपत्रिकेवर असलेले अन्य २ वर्गीकरणाचे विषय हे दप्तरी दाखल करण्यात आले़
एकाच व्यक्तीच्या दोन स्वाक्षऱ्या
सर्व दाखल विषयांवर महापालिका आयुक्त म्हणून व प्रशासक म्हणून एकाच व्यक्तीच्या म्हणजेच विक्रमकुमार यांच्या दोन सह्यांचे शिक्कामोर्तब नवीन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत होणार आहे़
चार गावांमधील कचरा संकलनासाठी निविदा मान्य
प्रशासक विक्रमकुमार यांच्या अधिकारात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्य विषयांमध्ये, महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी सूस, म्हाळुंगे, बावधान व कोंढवे धावडे या गावांमधील कचरा गोळा करण्याची निविदा मान्य केली़ ३ कोटी १० लाख रुपयांचा हा ठेका एक वर्षाकरिता दिला असून, या वर्षभरात ठेकेदाराकडून चार गावांमधील कचरा संकलन करून तो स्वत:च्या कचरा गाड्यांमधून त्याच्याच प्रक्रिया केंद्रांवर प्रक्रियेसाठी आणण्यात येणार आहे़