पुणे : दहा लाखांची लाच स्वीकारणारा महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा तत्कालीन लाचखाेर अधिष्ठाता डॉ. आशिष बनगीनवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यानंतर त्याला पाेलिस काेठडीही सुनावण्यात आली. या घटनेला ९ महिने उलटले तरीही त्याचे महापालिकेच्या पीएमसी मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट या वेबसाईटवरून नाव हटविण्यात आलेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त हाेत आहे. यावरून महापालिकेची वेबसाईट अपडेट हाेत नसल्याचेही समाेर आले आहे.
पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय मेडिकल काॅलेजमध्ये एमबीबीएसच्या जागेसाठी निवड झाली असतानाही प्रवेश देण्यासाठी डाॅ. बनगीनवार याने १६ लाख रुपयांची लाचेची मागणी करत दहा लाखाची लाच एका विद्यार्थ्याच्या पालकाकडून स्वीकारली हाेती. त्यामुळे त्याला अटकही झाली हाेती. त्याच्या पदाचा पदभार आता येथील दुसऱ्या महिला प्राध्यापक डाॅ. शिल्पा प्रतिनिधी यांच्याकडे देण्यात आला आहे.
दरम्यान, लाचखाेरीच्या घटनेमुळे महापालिकेची आणि महापालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाची बदनामी झाली हाेती. थेट अधिष्ठातानेच लाच स्वीकारल्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय क्षेत्रावर टीकाही झाली हाेती. डाॅ. बनगीनवार हा एकटा या प्रकरणात नसून महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टमधील विश्वस्तही यामध्ये सहभागी आहेत का, यावरूनही शंका उपस्थित केल्या जात हाेत्या. मात्र, याचे पुढे काही झाले नाही.
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाची देखील स्वतंत्र वेबसाईट असून त्यावर डाॅ. बनगीनवारचे नाव काेठेही नमूद नाही. मात्र, महापालिकेच्या वेबसाईटवरच हे नाव आहे. इतकेच नव्हे तर ट्रस्टच्या गव्हर्निंग बाॅडीवर माजी आराेग्य प्रमुख डाॅ. आशिष भारती यांचे नाव आहे. सध्या आराेग्यप्रमुख डाॅ. भगवान पवार यांचे नाव तेथे हवे. यामुळे महापालिकेची वेबसाईट अपडेट हाेते की नाही, हा प्रश्न निर्माण हाेत असून त्यामुळे गाेंधळ उडत आहे.