पाषाण: पालिकेच्या महिला जीमच्या आवारामध्ये सापडलेला दारूच्या बाटल्यांचा खच व परिसरात वाढलेली झाडी व अस्वच्छ परिसर वसुंधरा अभियानच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छ केला. बाणेर येथील सर्वे नंबर 13 मधील कै. सगुणाबाई ज्ञानेश्वर मुरकुटे महिला जिम पुणे महानगर पालिकेच्या वतीने अमेनिटी स्पेसच्या जागेत कोट्यावधी रुपये खर्च करून दोन मजली महिला जीमची इमारत उभारण्यात आली आहे. या जिमच्या आवारामध्ये दारू पिणाऱ्यांच्या संख्येमुळे हा परिसर मद्यपींचा अड्डा झाला होता.
नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेली ही इमारत वापरात यावी या हेतूने वसुंधरा अभियान व माऊली फाऊंडेशनच्या वतीने या परिसरातील घाण कचरा व दारूच्या बाटल्या काढून हा परिसर स्वच्छता करण्यात आला. नागरिकांच्या हिताच्या उपक्रमांसाठी ही इमारत वापरात आणावी तसेच या परिसरातील महिला जिम व योगा हॉल वापरात आणावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.