पुणे : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), मिळकत कर, बांधकाम शुल्क, पाणीपट्टी या महापालिकेच्या उत्पन्नाच्या मुख्य चार स्रोतांच्या भरवशावर अंदाजपत्रकाचा डोलारा उभा राहिला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्पाने ९ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी २०२३-२४ चे अंदाजपत्रक सादर केले.
चालू वर्षाच्या अंदाजपत्रकातील उत्पन्नात १ हजार ४९२ कोटी रुपयांची तूट येत आहे. त्यातच आगामी आथिक वर्षासाठी ९ हजार ५१२ कोटींचे अर्थसंकल्प सादर केले आहे. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांना पायाभूत सुविधा देताना आणि उत्पन्नवाढीचा ठोस पर्याय न सुचविता ९,५१५ कोटींचा टप्पा कसा पार पडणार, असा सवाल उपस्थित केला आहे. पुणे महापालिकेला मार्च अखेरपर्यंत ७ हजार १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक ठरले आहे.
समाविष्ट गावांमधून पाच वर्षात २०-४०-६०-८० टक्के आणि पाचव्या वर्षी १०० टक्के कर आकारणी होणार असल्याने कराचे उत्पन्न वाढणार आहे. समाविष्ट गावातील बांधकाम परवानग्या सध्या ‘पीएमआरडीए’कडे आहेत. पुढील वर्षी हे अधिकार महापालिकेकडे येणार आहेत. तसेच या गावांतील बांधकाम परवानगीतून मिळालेले ७५ टक्के उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेचे उत्पन्न १ हजार कोटी रुपयांनी वाढेल, असा दावाही आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे.