पुणे : महापालिका सभागृहाची मुदत संपल्याने मंगळवारपासून (दि़१५) प्रशासकराज सुरू झाले आहे. लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपुष्टात आल्याने नागरिकांना, त्यांच्या नागरी सुविधांबाबत प्रश्न, गाऱ्हाणी वा अन्य तक्रारीसाठी अधिकारी वर्गाला विशिष्ट वेळेत आप-आपल्या कार्यालयात थांबण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार सर्व खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, उप आयुक्त परिमंडळ १ ते ५ यांनी सोमवार व गुरूवारी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत आपल्या कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तसेच सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त (क्षेत्रिय कार्यालय प्रमुख) यांनी दररोज सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत आपल्या कार्यालयात उपस्थित रहावे. यावेळी नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकून त्यांचे निवारण करण्याची तातडीने कार्यवाही करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नागरिकांचे प्रश्न क्षेत्रिय कार्यालयस्तरावरच मार्गी लागतील अशा प्रकारे कामकाज करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर नागरिकांनी महापालिकेच्या टोल फ्री क्रमांक, व्हॉट अप क्रमांक व व्टिटर व फेसबुकवर आपल्या समस्या मांडून त्याचे निवारण करून घ्यावे असे आवाहन केले आहे़
तक्रारीसाठी संपर्क क्रमांक
टोल फ्री क्रमांक :- १७००१०३०२२२व्हॉटअप क्रमांक :- ९६८९९००००२व्टिटर व फेसबुक :- पीएमसी केअर