पुणे : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर पुणे महानगरपालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. सुरुवातील रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून दंडासाेबतच रस्ता साफ करुन घेतला जात हाेता. नाेव्हेंबरपासून आजपर्यंत महापालिकेने तब्बल 23 लाख 39 हजार रुपयांचा दंड नागरिकांकडून वसूल केला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांनी पालिकेला चांगलेच मालामाल केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, लघवी करणाऱ्या तसेच कचरा फेकणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. नाेव्हेंबरपासून ही कारवाई करण्यात येत असून 2 मार्चपर्यंत तब्बल 9 हजार सातशे 1 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 23 लाख 39 हजार दाेनशे 91 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. यात सर्वाधिक कारवाई ही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या 8 हजार तिनशे 16 लाेकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 21 लाख 46 हजार पाचशे 81 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्याखालाेखाल सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची संख्या असून 1 हजार दाेनशे 32 नागरिकांकडून 1 लाख 63 हजार आठशे 60 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी लघवी आणि साैचास बसणाऱ्यांकडून अनुक्रमे 24 हजार पाचशे 55 आणि 4 हजार दाेनशे 95 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईतून दंड वसूल करणे हा पालिकेचा हेतू नसून शहराला सुंदर बनविणे तसेच नागरिकांमध्ये शिस्त आणणे असा आहे. या कारवाईचा सकारात्मक परिणाम दिसत असून रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांच्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे.