पुणे : गेल्या काही वर्षांपासून शहरातील टेकड्यांवर अतिक्रमण केले जात आहे. काही ठिकाणी त्या तोडल्या जात आहेत. कोथरूडमधील जिजाईनगर येथे अतिक्रमण करून शेड उभ्या केल्या होत्या. त्यावर कारवाई करत महापालिकेच्या वतीने हे शेड काढण्यात आले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे हे अतिक्रमण उघडकीस आले होते.
शहराच्या आजूबाजूला अनेक टेकड्या आहेत. त्यावर कित्येक वर्षांपासून वन्यजीव, पक्षी यांचा अधिवास आहे. तिथे दुर्मीळ वृक्षराजी बहरत असते. परंतु, काही समाजकंटक या टेकड्यांवर अतिक्रमण करून तेथील अधिवास, झाडे नष्ट करत आहेत. त्याविरोधात वेताळ टेकडीवर अनेक ग्रुप कार्यरत आहेत. तसेच कोथरूडमधील महात्मा टेकडी, म्हातोबा टेकडीसाठीही टेकडीप्रेमी समोर येत आहेत.
याविषयी मकरंद शेटे म्हणाले, आम्ही म्हातोबा टेकडीवर अनेक वर्षांपासून झाडं लावली आणि ती जोपासली आहेत. या टेकड्यांवर अनधिकृतपणे राहण्याचा घाट काहीजण करत आहेत. कोथरूडमधील जिजाईनगर परिसरातील टेकडीवर काही दिवसांपासून अतिक्रमण झाले होते. तिथे पत्र्यांचे शेडही मारले होते. त्याविरोधात आम्ही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भेटलो आणि सर्व माहिती दिली. त्यानंतर त्याची दखल घेऊन त्यांनी त्वरित शेड काढण्याची मोहीम राबविली.
काही दिवसांपूर्वी महात्मा टेकडीवरही अतिक्रमण झाले होते. अनेकांनी वाहने वर नेली होती. तेव्हा त्याविषयी तक्रार केल्यावर तेथून अतिक्रमण काढले. आता टेकडीवर वाहने येऊ नयेत म्हणून ठिकठिकाणी चर खोदले आहेत. जेणेकरून वाहने तिथून जाणार नाहीत, असेही शेटे म्हणाले.
काेथरूड परिसरात महात्मा टेकडी, एआरआय टेकडी, म्हातोबा टेकडी आहे. त्या ठिकाणांवर आम्ही दररोज लक्ष ठेवून आहोत. सातत्याने टेकडीवर अतिक्रमण केले जात असल्याने याविषयी प्रशासन, वन विभागाने गस्त वाढविणे आवश्यक आहे.
- मकरंद शेटे, टेकडीप्रेमी, कोथरूड.