पुणे - लोकसभेपासून ते महापालिकेपर्यंत दोन पंचवार्षिक मध्ये काँग्रेसच्या शहर शाखेला लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही पक्षाला शहरात अपयशाचा सामना करावा लागला. मात्र ते अपयश बाजूला ठेवत काँग्रेसने महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय निरिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचे, संघटन वाढवण्यावर भर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पक्षाच्या प्रदेश शाखेच्या आदेशाप्रमाणे शहराध्यक्ष अऱविंद शिंदे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. त्यानुसार शहराच्या मध्यभागातील कसबा, कोथरूड, पर्वती, कॅन्टोन्मेट, शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे ॲड. अभय छाजेड, सुनील शिंदे, संजय बालगुडे, दीप्ती चवधरी, अविनाश बागवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराचे उपनगर समजल्या जाणाऱ्या वडगाव शेरी व हडपसर या दोन विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे बाळासाहेब शिवरकर व सुजीत यादव यांची नियुक्ती झाली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे बरेच प्रभाग आहेत, मात्र या यादीत खडकवासला मतदारसंघाचे नाव नाही. लवकरच तेथील नियुक्तीही करण्यात येईल असे शहर शाखेचे वरिष्ठ पदाधिकारी अजित दरेकर यांनी सांगितले.
याच बरोबर निरिक्षकांना मदत करण्यासाठी म्हणून सहायक निरीक्षकही नियुक्त करण्यात आले आहेत. संतोष आरडे, राजेंद्र भूतडा, संदीप मोकाटे, सतीश पवार, मेहबूब नदाफ, अजित दरेकर, देवीदास लोणकर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. निरिक्षकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका आयोजित करायच्या आहेत, नवीन कार्यकर्ते तयार करणे, त्यांच्यावर जबाबदारी देणे, पक्षाची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत नेणे अशा प्रकारची कामे या निरिक्षकांनी करायची आहेत. महापालिका निवडणूक जाहीर होईल तेव्हा होईल, मात्र त्याआधी शहरात पक्ष संघटन वाढवण्याच्या दृष्टिने काँग्रेसेने प्रयत्न सुरू केल्याचे यावरून दिसते आहे.
पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली. त्यांनी पदभारही स्विकारला आहे. त्यामुळे आता ते त्यांची नवी कार्यकारिणी निवडतील. त्याला महिनाभरापेक्षा अधिक कालावधी जाईल. तोपर्यंत पक्ष महापालिका निवडणुकीसाठी तयार असावा या हेतूने या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचे काँग्रेसमध्ये बोलले जात आहे, त्याचबरोबर नव्या कार्यकारिणीतही आपले नाव असावे या उद्देशानेच आता सक्रियता दाखवली जात आहे अशीही चर्चा आहे.