पुणे : राज्यातील राजकीय घडामोडी पाहता महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपप्रणीत सरकार येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. असा बदल झाला तर भाजपला अपेक्षित चार सदस्यीय प्रभाग रचना पुन्हा येऊन महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र बदलण्याची धास्ती अनेकांनी घेतली आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने सन २०१७ च्या निवडणुकीत केलेल्या चार सदस्यीय प्रभाग रचना बदलून शिवसेनेच्या आग्रहाखातर तीन सदस्यीय सदस्य रचना करण्यात आली. यातून महापालिकेतील भाजपचे वर्चस्व संपणार अशी रणनीती रचण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेची निवडणूक लढवायची व त्यानुसार जागा वाटप करायचे, असे प्राथमिक चर्चेत ठरलेही होते.
परंतु राज्यातील महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेतील बंडाळी ही येत्या मंगळवारी कोणते समीकरण समोर ठेवते, यावर महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. यामध्ये भाजपप्रणीत सरकार आले तर, महापालिकेची प्रभागरचना तीन सदस्यांहून चार सदस्यांची होईल अशी शक्यता अनेक इच्छुक, तसेच भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही शक्यता खूपच कमी असल्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचना व त्यानुसार सर्व नियोजन झाले आहे. मात्र, तरीही यात बदल करून पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली, तर आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असे स्पष्ट केले आहे.