-कल्याणराव आवताडे
धायरी : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी २३ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यादीत त्रुटी आढळल्याने नावे शोधताना सत्ताधारी, विरोधक यांच्यासोबतच इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मतदार राहतात एका प्रभागात आणि त्यांची नावे भलत्याच प्रभागात आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्प कालावधीत हरकती कशा घ्यायच्या, असा प्रश्न पक्षासमोर उभा राहिला आहे.
यादीवर हरकत घेण्यासाठी १ जुलैपर्यंत मुदत आहे. प्रभागांची रचना ज्याप्रमाणे झाली, त्याचप्रमाणे मतदारांची नावे आपापल्या प्रभागात येणे अपेक्षित आहे; मात्र महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या याद्यांत घोळ आहे. यासंदर्भात सत्ताधारी, राजकीय नेते, कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांसह इच्छुकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. एकाच प्रभागातील हजारो नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने इच्छुकांची गोची झाली आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता आहे.
हरकतींसाठी वेळ कमी असला तरी निवडणुकीला वेळ असल्याने महापालिकेने निवडणूक आयोगाकडून वेळ मागून घेऊन याद्या दोषरहित कराव्यात, अशी मागणी राजकीय पक्ष करत आहेत.
लोकसंख्या ६४ हजार अन् मतदारयादीत १ लाख ३ हजार
प्रभाग क्रमांक ५४ मध्ये अंतिम प्रभाग रचनेत लोकसंख्या ६४, ०७१ एवढी दाखविण्यात आली आहे; मात्र आता प्रारुप मतदार यादीत तब्बल १ लाख ३ हजारांच्या आसपास नावे दिसत आहेत. यामध्ये कात्रज, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ, गुजरवाडी, धायरी गारमाळ आदी परिसरातील मतदारांची नावे समाविष्ट आहेत.
मुळात प्रारुप मतदार याद्या बनविताना सर्व पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेऊन याद्या प्रसिद्ध करायला हव्या होत्या. अधिकाऱ्यांनी प्रभागानुसार काळजीपूर्वक नावे तपासली नसल्याने हा गोंधळ झाला आहे.
- काकासाहेब चव्हाण, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, खडकवासला मतदारसंघ
मतदार यादी बनवताना प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. वास्तव्य एका प्रभागात आणि मतदार यादीत नाव भलत्याच प्रभागात असे प्रकार झाले आहेत. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अंतिम मतदार याद्या प्रभागनिहाय, तसेच दोषरहित तयार कराव्यात.
- सागर भूमकर, माजी उपसरपंच, नऱ्हे
प्रभाग क्रमांक ५१ वडगाव- माणिकबाग यामधील प्रारुप मतदार यादी पाहिली असता त्यामध्ये वारजे भागातील काही नावे आढळून आली आहेत. वारजे भागाचा आणि या प्रभागाचा काहीही संबंध नाही. चुकीच्या पद्धतीने याद्या तयार करण्यात आल्या आहेत.
- हरिदास चरवड, माजी नगरसेवक