पुणे :पुणे महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या ५८ प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीनुसार एकूण मतदारांची संख्या समोर आली असली तरी, महापालिकेच्या संकेतस्थळावर अद्यापही अनेक प्रभागांच्या याद्याच उपलब्ध झालेल्या नाहीत. निवडणूक आयोगाने दिलेली मुदत उलटून चार दिवस झाले तरी अंतिम मतदार यादीचा हा घोळ अद्यापही सुरूच आहे. यामुळे इच्छुकांसह सर्वच राजकीय पक्ष महापालिकेच्या निवडणूक विभागावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जून महिन्यात महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या हाेत्या. त्या याद्यांवर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावरील सुनावणी पूर्ण झाल्यावर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २१ जुलै रोजी जाहीर करावी, असे आदेश आयोगाने दिले होते.
२१ जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या नव्हत्या. यावेळी निवडणूक विभागाने २२ जुलै रोजी सर्व प्रभागांच्या याद्या संकेतस्थळावर तसेच क्षेत्रीय कार्यालयात उपलब्ध राहतील, असा दावा केला. परंतु, ताे फाेल ठरला असून, याद्यांचा घाेळ अद्याप संपलेला नाही. महापालिकेच्या संकेतस्थळावर एकूण ५८ पैकी ३१ प्रभागांच्या याद्याच उपलब्ध आहेत.
महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून मतदार याद्या अंतिम झाल्या असून, त्या केवळ प्रिंट होऊन आल्या नसल्याचे सांगण्यात आले आहे. या याद्या सोमवारी रात्रीपर्यंत तयार होऊन सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वितरित करण्यात येतील, असा दावा करण्यात आला आहे. तर संकेतस्थळावर आयोगाकडून जसजशा प्रभागनिहाय मतदार याद्यांच्या पीडीएफ फाईल येतील त्या लागलीच अपलाेड करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. मात्र या कधीपर्यंत येतील ते आमच्या हातात नसल्याचेही संबंधितांनी स्पष्ट केले आहे. यामुळे मतदार याद्यांचा घोळ संपणार तरी कधी, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
या प्रभागांच्या याद्या अद्याप नाहीत
पूर्व खराडी-वाघाेली, पश्चिम खराडी-वडगाव शेरी, वडगाव शेरी-रामवाडी, शनिवारवाडा-कसबा पेठ, छत्रपती शिवाजी स्टेडीयम-रास्ता पेठ, पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता, हडपसर गावठाण-सातववाडी, वानवडी गावठाण-वैदूवाडी, रामनगर उत्तमनगर-वणे, कर्वेनगर, शिवदर्शन-पद्मावती, काेंढवा खुर्द-मिठानगर, रामटेकडी-सय्यदनगर, वानवडी-काैसरबाग, काळे बोराटेनगर-ससाणेनगर, माेहम्मदवाडी-उरुळी देवाची, कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी, अप्पर सुप्पर-इंदीरानगर, बालाजीनगर-शंकर महाराज मठ, वडगाव बुद्रुक-माणिकबाग, नांदेड सिटी-सनसिटी, खडकवासला-नऱ्हे, धायरी-आंबेगाव, धनकवडी-आंबेगाव पठार, चैतन्यनगर-भारती विद्यापीठ, सुखसागरनगर-राजीव गांधीनगर, कात्रज-गाेकुळनगर.