पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ३१ मे रोजी घेण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवरील हरकती निकाली काढत, सोमवारी प्रभागनिहाय आरक्षण अंतिम करण्यात आले आहे. हे अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध होणार असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
महापालिका निवडणुकीसाठी ५८ प्रभागांमध्ये १७३ सदस्यांपैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. यामध्ये १२ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमातीसाठी आरक्षण राहणार आहे. तर ७४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण राहणार आहे. ज्या प्रभागात किमान दोन जागा खुल्या आहेत, अशा ३३ प्रभागांमधून सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव १७ प्रभागांची सोडत ३१ मे रोजी काढण्यात आली. तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २३ प्रभागांतून १२ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
या आरक्षण सोडतीवर नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी ६ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. या काळात आलेल्या १८ हरकतीपैकी बहुतांशी हरकती या अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाबाबत होत्या. या सर्व हरकती आज निकाली काढण्यात आल्या असून, प्रभागनिहाय आरक्षण अंतिम करण्यात आले आहे.
आरक्षण सोडत काढतानाच्या प्रक्रिया काळात गैरप्रकार अथवा चुकीच्या पद्धतीने आरक्षण काढण्यात आल्याचे आक्षेप नोंदविण्यात आले नव्हते. त्यामुळे आरक्षण अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून हे अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक शाखेचे प्रमुख डॉ. यशवंत माने यांनी दिली.