PMC ELECTION: पुणे महापालिका निवडणुकीत आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार? मनसेचं इंजिनही धावण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 01:58 PM2021-08-26T13:58:58+5:302021-08-26T13:59:06+5:30
एक सदस्यीय प्रभाग रचनेनं राजकीय समीकरणं बदलणार; महापालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता
पुणे : शहरात एक सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पक्षाच्या मतांपेक्षा उमेदवार व त्याचा वैयक्तिक जनसंपर्क अधिक महत्वाचा ठरणार असून, लोकसंख्येच्या आधारावर होणाऱ्या या रचनेमुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचणे हे इच्छुक उमेदवारांसमोर आव्हान असणार आहे.
चार सदस्यीय प्रभाग रचना व केंद्र तथा राज्यातील सत्ता यामुळे सन २००१७ मध्ये महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. परंतु, एक अथवा दोन सदस्यीय प्रभाग रचनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाल्याचाही इतिहास आहे़ सन २००७ मध्ये एक सदस्यीय प्रभाग असताना व २०१२ मध्ये दोन सदस्यीस प्रभाग असताना राष्ट्रवादी काँग्रेसच बहुमताने विजयी झाले. त्यातच आता नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य लक्षात घेता, एक सदस्यीय प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसला फायदेशीर ठरणार असे दिसून येत आहे. त्यामुळे या पक्षाला बहुमत मिळाले नाही तरी महापालिकेतील सत्तांतर हे अटळ आहे.
सर्वच पक्ष स्वतंत्र लढ्याच्या तयारीत
आगामी महापालिका निवडणुक महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र लढतील अशी शक्यता सध्या तरी नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यांवरून दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विद्यमान ९ सदस्य कमी होणार की, काँग्रेस पुन्हा शहरात उभारी घेणार हे लवकरच दिसून येईल़ परंतु, या सर्वांमध्ये आता पक्षांच्या मतांपेक्षा वैयक्तिक जनसंपर्क, समाजपयोगी काम, प्रभागातील वर्चस्व या बाबी वरचढ ठरणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना युती झाली तरी, शिवसेनेच्या वाट्याला त्यांची शहरातील ताकद लक्षात घेता फारशा जागा येतील अशी शक्यताही नाही़ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात अधिक लक्ष घालून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला असल्याने, मनसेची सदस्य संख्या दोनहून पुन्हा दोन आकडी संख्या पार करणार का हेही महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान रिपब्लिक न पक्ष, वंचित आघाडीने स्वतंत्र निवडणुक लढवली तर शहरातील काही भागात त्यांची वोट बँक मोठी असल्याने त्यांचीही संख्या यावेळी निश्चित वाढेल असे चित्र आहे.
एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल अशी शक्यता आतातरी धूसर
दोन सदस्यीस अथवा चार सदस्यीय प्रभाग रचनेत पक्षातील एका ताकदवार उमेदवारामुळे अन्य उमेदवारांना फायदा झाल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. पण आता एक सदस्यीय प्रभागामुळे शहरातील सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. सध्या शहरातील तीनही प्रमुख पक्ष आमच्यासाठी ही निवडणुक सोपी असल्याचे सांगत आहेत. परंतु, साधारणत: २० ते २३ हजारांच्या लोकसंख्येच्या प्रभागात किती मतदान तेथील इच्छुक स्वत:कडे वळू शकतात यावर पुढील गणिते अवलंबून राहतील़ यामध्ये पक्षाच्या कामाचाही वाटा असेल पण तो तुलनेने कमीच राहणार आहे. यामुळे आगामी निवडणुकीत कोण्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल अशी शक्यता आतातरी धूसर वाटत आहे.