पुणे : आंबेगाव बुद्रुक येथे सिंहगड महाविद्यालयलगत सर्र्व्हे क्रमांक १- मध्ये ११ बहुमजली अनधिकृत निवासी मिळकती बांधल्या होत्या. या इमारतींवर महापालिकेने शुक्रवारी धडक कारवाई केली. यात ४५ हजार ५० चौरस फुटाचे बांधकाम पाडण्यात आले आहे.
या इमारतीबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. इथे २०२१ पासून बांधकाम सुरू हाेते. तत्कालीन कनिष्ठ अभियंत्यांनी बांधकामांना नोटिसा बजावल्या; पण कारवाई केली नाही. त्यामुळे २०२३ पर्यंत सुमारे ५०० सदनिकांचे बांधकाम झाले, त्यातील काही ठिकाणी नागरिक राहण्यासाठी गेले. आजच्या कारवाईमुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत.
ज्या कनिष्ठ अभियंत्यांच्या कालावधीत हा प्रकार झाला, त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. जॉ क्रशर मशिनने या ११ इमारतींवर कारवाई केली आहे.
महापालिकेने २०२१ मध्ये नोटीस देऊन तेव्हाही कारवाई केली होती. यंदाही एप्रिलपासून पुन्हा नोटीस देण्यात आली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
- हेमंत मोरे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग