पुणे :पुणे महापालिकेने मिळकतकर न भरणाऱ्या सील केलेल्या २०२ मिळकतींचा पालिकेकडून लिलाव केला जाणार आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे ५२ कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या ३२ मिळकतींचा लिलाव प्रशासनाने जाहीर केला होता. या मिळकतींची बाजारभावातील किंमत तब्बल दोनशे कोटींपेक्षा अधिक होती. ही कारवाई सुरू होण्यापूर्वीच तब्बल २० मिळकतधारकांनी १ कोटी ६० लाखांचा कर जमा केला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आता केवळ १२ मिळकती असणार आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी यातील पहिला ऑनलाइन लिलाव होणार आहे.
महापालिकेकडून लिलाव प्रक्रिया जाहीर केल्यानंतर तसेच मिळकतींचे बाजारमूल्य निश्चित केले होते. या ३२ मिळकतींचा महापालिकेचा मिळकतकर सुमारे साडेसहा कोटींचा असून या मिळकतींचे बाजारमूल्य प्रत्यक्षात २०० कोटी आहे. महापालिकेने याबाबत मिळकतधारकांना नोटीस दिल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. पालिका लिलाव करणार नाही आणि नेहमीप्रमाणे नोटीस बजावेल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात पालिकेने लिलावाची तारीख जाहीर करून अंतिम नोटीस देताच खडबडून जागे झालेल्या २० मिळकतधारकांनी १ कोटी ६० लाखांचा कर जमा केला आहे. या लिलावासाठी महापालिकेसही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र असून, आतापर्यंत केवळ ६ ते ७ जणांनीच लिलावासाठी नोंदणी करून एक टक्का अनामत रक्कम भरली आहे.