पुणे : वडगाव शेरी स. नं. १३ येथील हॉटेल एलरो यांनी टेरेसवर अनधिकृतपणे शेड बांधून हॉटेल व्यवसाय सुरू केला हाेता. ही बाब समाेर येताच महापालिकेच्या बांधकाम विकास नियंत्रण विभागाच्या वतीने १४ हजार चौरस फूट कच्च्या बांधकामावर कारवाई केली.
पुणे महापालिकेने एमआरटीपी १९६६ अन्वये कलम ५३ नुसार संबंधितास २ ऑगस्ट २०२२ रोजी नोटीस बजावली होती. त्याला कुठलेही उत्तर न दिल्याने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. महापालिकेकडून याकामी ६ गॅस कटर, १२ बिगारी, ८ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि पोलिसांची मदत घेण्यात आली.
या कारवाईसाठी पुणे महापालिकेकडून कार्यकारी अभियंता अजित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे मनपा बांधकाम निरीक्षक विष्णू तौर, पंकज दोंदे, योगेश गुरव हे उपस्थित होते. यापूर्वी या ठिकाणी दोन वेळा कारवाई करण्यात आली असून, एमआरटीपी ॲक्ट १९६६ मधील ४३ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.