पुणे : महापालिकेच्यावतीने शहराच्या विविध भागात उभारलेल्या १२०० सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांऐवजी, आता खाजगी यंत्रणेच्या (ठेकेदार कंपनीकडून) माध्यमातून करण्यात येणार आहे. याकरिता पाच वर्षांसाठी ५२ कोटी ५३ लाख रूपयांचा खर्चाच्या निविदा प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
शहरातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेची सध्या यंत्रणा आहे. या यंत्रणेवरही वर्षाला कोट्यावधी रूपये खर्च केले जात असले तरीही, शहरातील बहुतांशी स्वच्छतागृहे नेहमीच अस्वच्छ राहत आहेत. सार्वजनिक युरिनल आणि सार्वजनिक शौचालयांचीही दुरावस्था, तेथील अस्वच्छता व दुर्गंधी हीच या स्वच्छतागृहांची ओळख बनली आहे. महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सर्व स्वच्छतागृहांची दररोज दोनवेळा स्वच्छता करण्याची जबाबदारी देण्यात आली असली तरी ती नेहमीच अस्वच्छ असतात.
या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिकेच्या सर्व स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी, निविदा काढून खासगी संस्थांची नेमणूक केली जाणार आहे. पाच झोनसाठी वेगवेगळ्या पाच निविदा काढण्यात येणार आहेत. यासाठी पाच वर्षाला ५२ कोटी ५३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
दरम्यान महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या ४१ जेटिंग मशिन या स्वच्छतागृहांची स्वच्छता करणाऱ्या ठेकेदारास भाडेकराराने दिल्या जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेचे काम खासगी ठेकेदाराला गेले, तरी पालिकेच्या मशिनचा वापर होणार असून, महापालिकेला यातून उत्पन्न मिळणार आहे.