- किरण शिंदे
पुणे :पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार कुणाच्या दबावाखाली राहून काम करतायेत का असा सवाल पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला आहे. कारण विक्रम कुमार यांच्या म्हणजेच प्रशासक काळात पुणे महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मिळणारे सॅनिटरी नॅपकिन अचानक बंद झाले. सॅनिटरी नॅपकिनची टेंडर प्रक्रिया खोळंबल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप अरविंद शिंदे यांनी केलाय.
पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तब्बल 38 हजार विद्यार्थ्यांना पालिकेकडून मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यात येतात. मात्र महानगरपालिकेत प्रशासक राज आल्यापासून हे मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळतच नसल्याचे समोर आले आहे. शिवसेना खासदार आणि भाजप आमदार यांच्यात टक्केवारीवरून सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे हे टेंडर खोळंबले असल्याचा आरोप केला जात आहे.
आपण शिफारस केलेल्या ठेकेदारालाच हे काम मिळावे यासाठी हे दोघेही आग्रही आहे याचा फटका या टेंडर प्रक्रियेला बसला आहे. टेंडर देण्यासाठी महापालिकेच्या आधिकाऱ्यांवर भाजप नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.