पुणे : शहरतील घनकचरा उचलण्याचे काम कामगारांकडून केले जात होते. तो रस्त्यालगतचा कचरा उचलून तो कंटेनरमध्ये टाकला जात असते. परंतु, आता मानवी हस्तक्षेप कमी होणार असून, त्यासाठी खास हायड्रोलिक यंत्रणा बसविलेले कंटेनर आजपासून सुरू झाले आहेत. त्यामुळे हाताने कचरा उचलण्याचे थांबणार आहे.
हायड्रोलिक यंत्रणा असलेल्या ८० गाड्यांचे लोकार्पण सोमवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आमदार सिध्दार्थ शिरोळे, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त आशा राऊत आदी उपस्थित होते. रिफ्यूज कलेक्टर वाहनांचे लोडिंग नंतरचे वजन १४ मेट्रिक टन असून, कचरा वाहून नेण्यासाठी वाहनावरील क्षमता वाढवलेली आहे. वाहनात कचरा लोड करण्यासाठी हायड्रॉलिक यंत्रणा आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होतील. कॉम्पॅक्टरमधून सुका कचरा हायड्रॉलिक यंत्रणेच्या सहाय्याने दाबून तो कंटेनरमध्ये टाकला जाईल. यामुळे उपलब्ध घनफळ क्षमतेत जास्त कचऱ्याची वाहतूक होणार आहे.
शहरात दररोज महापालिकेच्या हद्दीत सुमारे २१०० मेट्रिक टन घनकचरा निर्माण होतो. निर्माण झालेला घनकचरा संकलन व वाहतूक करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम महापालिका करते. सद्यस्थितीत घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी पुणे महापालिकेकडे स्वत:च्या मालकीची सुमारे ५१८ वाहने असून, पुणे शहरात निर्माण होणारा कचरा संकलन व वाहतूक होते. पुरेसी वाहने नसल्याने ५६ कॉम्पॅक्टर, १०८ छोटी घंटागाडी व ९३ रिफ्यूज कलेक्टर अशी एकूण २५७ वाहने भाडेतत्वावर आहेत.
भाडेतत्वावरील सर्व वाहनांवरती GPS व RFID उपकरणे बसविलेली असून, सर्व वाहनांच्या कामकाजाची नोंद व देखरेख पुणे मनपाच्या Command and Control Centre मार्फत होईल. सदरची २५७ वाहने सात वर्ष कालावधी करिता भाडेतत्वावर घेण्यासाठी झोन निहाय ५ निविदा मागविलेल्या आहेत. पाच निविदांचा सात वर्षाचा एकूण खर्च अंदाजे ३२५ कोटी रू. इतका आहे.
कॉम्पॅक्टर, छोटी घंटागाडी व रिफ्यूज कलेक्टर वाहने अत्याधुनिक बीएस-६ प्रदूषण मानांकनाची असून यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. छोटी घंटागाडी संवर्गातील वाहने ही सीएनजी इंधनावरील असल्याने शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.