पुणे :पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील छोट्या प्लॉटवरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात आणि त्यावर महापालिकेकडून होणारी करावाईच्या रॅकेटची सखोल चौकशी करण्यात येईल. असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी विधीमंडळ सभागृहात दिले.
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमांतून समाविष्ट ३४ गावांमधील छोट्या प्लॉटवरील अनधिकृत बांधकामे नियमीत करण्यासंदर्भात आणि त्यावर महापालिकेकडून होणारी करावाई याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना सामंत यांनी हे आश्वासन दिले. ते म्हणाले, अनधिकृत बांधकामे करणे हा गुन्हा आहे. मात्र, अशी बांधकामे सुरू होतात तेव्हा लगेचच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु, बांधकामे पूर्णत्वास आल्यानंतर कारवाई होत असेल आणि त्यात ठराविक बांधकामावर कारवाई होत असले तर त्यांची चौकशी केली जाईल.
आमदार टिंगरे म्हणाले, समाविष्ट झालेल्या गावांमधील छोट्या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी कोणतीही नियमावली नाही. शहरात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी पालिकेत येण्यापूर्वीच या समाविष्ट गावांमध्ये एक - दोन गुंठ्यांचे छोटे प्लॉट घेतले. यावर बांधकामे पूर्णत्वास आल्यावर महापालिका त्यांना कारवाईची नोटीस बजावते. अशा वेळी कारवाई रोखायची असेल तर संबंधित तक्रारदार यांना भेटण्यास सांगितले जाते. तक्रारदार यावेळी लाखो रुपयांची मागणी करतो व काही लोक त्यांची मागणी पूर्ण करतात, व त्यांच्यावरील कारवाई थांबते. व जी गोर- गरीब पैसे देऊ शकत नाही, अशांच्या बांधाकांमावर कारवाई होते असा आरोपही टिंगरे यांनी केला आहे. दरम्यान महापालिकेकडून होणाऱ्या अशा कारवाया थांबविण्यात याव्यात आणि छोट्या व अग्रीकल्चर प्लॉटवरील बाधकामे नियमित करण्यासाठी नियमावली करावी अशी मागणी आमदार टिंगरे यांनी राज्य सरकारकडे यावेळी केली.