पुणे : बांधकामाचा नियमितीकरणाचा दाखला प्रमाणित करून देण्यासाठी व बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभागातील बिगारी सुपरवायजरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
गोपीचंद दत्तात्रय पठारे (वय ४५, रा़ बिगारी, सुपरवायजर. बांधकाम विभाग पुणे महानगर पालिका) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या काकांनी सह्याद्री पार्क सोसायटीत २००४ साली केलेल्या बांधकामाचा नियमितीकरणाचा दाखला प्रमाणित करून देण्यासाठी व बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यावेळी बिगारी पठारे यांनी त्यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याची पडताळणी केल्यावर त्याने तडजोडीअंती २० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी पथकाने शिवाजीनगर गावठाण येथील दिलीप टी येथे सापळा रचला़ पठारे यांना तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका मुख्यालय बिगाऱ्यांच्या ताब्यातमहापालिकेच्या मुख्य इमारतीमधील जवळपास प्रत्येक खात्यातील साहेबांची व पदाधिकाऱ्यांच्या दालनातील प्रमुख कामे बिगाऱ्यांच्याकडून केली जात आहेत. ही कामे करणारे मूळ कारकून व कर्मचारी आवारातील हॉटेलांमध्ये व हे बिगारी त्यांच्या टेबलवर अशी स्थिती सध्या महापालिकेतील बहुसंख्य खात्यांच्या कार्यालयांमध्ये आहे. महापालिकेच्या कायम सेवेत असलेल्या या बिगारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या प्रभाग; तसेच क्षेत्रीय कार्यालयात असल्या, तरी नगरसेवक किंवा साहेबांच्या वरदहस्तामुळे त्यांचा वावर दिवसभर मुख्यालयातच असतो. असे वृत्त लोकमत ने २३ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते़ त्याचा प्रत्यय गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईत दिसून आला़ महापालिकेतील कोणतीही कामे करण्यासाठी ते इतरांच्या वतीने मांडवली करीत असल्याचे या कारवाईवरुन दिसून येत आहे़