राजू इनामदार
पुणे : आठ दिवस झाले लॉकडाऊनला. माणसे रस्त्यांवर येत नव्हती, पण कचरा तर निर्माण होतच होता. खरेतर नेहमीपेक्षा जास्तच, किती तर, 2 हजार टन रोज. पण तरीही अगदीच मोजका अपवाद वगळता कुठे कचरा साचलेला, ओसंडून वहात असलेला असा दिसला नाही. रस्त्यांवरही घाण पडून आहे, असे झाले नाही ?
हे यश आहे पुणेकरांसाठी पहाटेपासून दुपारपर्यंत श्रमणाऱ्या 30 हजार हातांचे. त्यांचे नियोजन करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील वरिष्ठांचे आणि त्यांना साथ देणाऱ्या वाहन विभागाचे. त्यांनी संचारबंदीतही आपल्या कामात खंड पडू दिला नाही आणि यापुढेही पडून देणार नाही असा निर्धारच केला आहे. स्वच्छच्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांनीही त्यांना साथ दिली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला अतोनात महत्व.प्राप्त झाले आहे. त्यामुळे कचरा कुठे साचून राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. या काळात अपवाद वगळता रस्त्यावर काम करणाऱ्या कोणीही कामगाराने सुटी घेतलेली नाही याचा मला अभिमान.आहे.
रोजच्या रोज स्वच्छ करावे लागणारे क्षेत्र आहे तब्बल ३१४ चौरस किलोमीटर. पालिकेचे कायम साडेसात हजार आणि कंत्राटी साडेसात हजार असे तब्बल १५ हजार कर्मचारी हे काम करतात. स्वच्छच्या साडेतीन हजार कर्मचार्यांचाही यात समावेश आहे. पहाटे ६ वाजता परिसर स्वच्छतेचे काम सुरू होते. त्यापुर्वी कर्मचार्यांना आपल्या आरोग्य कोठीवर हजेरी द्यावी लागते. कोण कुठे कोण कुठे राहते, पण त्यांना हजेरीसाठी कोठीवर यावेच लागते. त्यांच्या या कामावर जाण्यायेण्याची व्यवस्था करण्यासाठी पीएमपीएलच्या गाड्या केंद्रनिहाय ऊपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वांना ओळखपत्र दिली आहेत.
सफाई कर्मचाऱ्यांना हातमोजे, सँनिटायझर देण्यात आले. त्याचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. कचरा केंद्र निहाय जमा होतो. ७६५ वाहने हा कचरा वाहून नेण्याचे काम करतात. रस्त्यांची यांत्रिक स्वच्छता करणारी १२ वाहने आहेत. कामगारांचे वेळापत्रक निश्चित करून देण्यात आले आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक व वाहन विभागाचे ऊपायुक्त नितीन ऊदास यांनी सांगितले.