पुणे : सार्वजनिक ठिकाणी होणारे पार्किंग सशुल्क असेल, असे महापालिकेने तयार केलेल्या पार्किंग धोरणामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, तरीही मॉल्स व मल्टीप्लेक्समध्ये मोफत पार्किंग देण्याचे आदेश पालिकेने दिले आहे. हे आदेश त्यांच्याच पार्किंग धोरणाविरोधात आहेत. तसेच अनेक प्रगत शहरांमध्ये पार्किंग मोफत न ठेवण्याच्या तत्वाला धरून नाहीत. पालिकेचे पार्किंग धोरणही धुळखात पडले आहे. त्यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत वाहतुकतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
शहरांमधील वाहतुक कोंडीमध्ये रस्त्यांवर वाहनांच्या पार्किंगचा वाटा मोठा आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यांवरील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनू लागली आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक पार्किंगचे नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे कोंडीमध्ये अधिकच भर पडते. पार्किंगसाठी देण्यात आलेल्या जागाही अपुºया पडू लागल्या आहेत. त्यामुळे पार्किंग धोरण तातडीने निश्चित करणे गरजेचे बनले आहे. पण पालिकेने तयार केलेले धोरण अनेक महिन्यांपासून धुळखात पडू आहे. त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. या धोरणामध्ये सार्वजनिक ठिकाणांचे, रस्त्यावरील पार्किंग सशुल्क असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी शुल्काची रचनाही निश्चित करण्यात आली आहे. पण राजकीय इच्छाशक्ती अभावी हे धोरण अंतिम झालेले नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.
पादचारी प्रथम या संस्थेचे निमंत्रक प्रशांत इनामदार यांनी मॉल व मल्टीप्लेक्समधील मोफत पार्किंगला विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले, मोफत पार्किंगमुळे वाहने रस्त्यावर आणण्यास अधिकाधिक प्रोत्साहन मिळते. त्यामुळे सर्व ठिकाणी सशुल्क पार्किंग असायला हवे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही तिथे राहणाºयांना पार्किंगच्या जागेचे पैसे द्यावे लागतात, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे रस्ता किंवा इतर ठिकाणी जागेच्या वापरासाठी शुल्क घेण्यास काहीच हरकत नाही. मॉल व मल्टीप्लेक्सने ग्राहकांच्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. परिसरात बसथांबे, रिक्षाथांब्यांना जागा देणे, पदपथ अशा सुविधांचा देखभाल त्यांनी करायला हवी. जेणेकरून वाहन न आणणाºया ग्राहकांना प्रोत्साहन मिळू शकेल. त्यांना सशुल्क पार्किंगला परवानगी दिली तरी त्यांचे शुल्क कमी असायला हवे. त्यांनी पार्किंग शुल्क परत देण्याबाबत विविध योजना आखायला हव्यात. परिसरात पार्किंग करण्यास बंधने आणायला हवीत, असे इनामदार यांनी स्पष्ट केले.
प्रांजली देशपांडे, वाहतुक तज्ज्ञ : महापालिकेने तयार केलेल्या पार्किंग धोरणानुसार सर्व ठिकाणी सशुल्क पार्किंग असणे अपेक्षित आहे. पण मॉल व मल्टीप्लेक्समध्ये मोफत पार्किंग करण्याचा आदेश देऊन पालिका आपल्याच धोरणाच्या विरोधात निर्णय देत आहे. रस्त्यावरील वाहने कमी करण्यासाठी सशुल्क पार्किंगच असणे आवश्यक आहे. शहरातील वाहतुक, पार्किंगची समस्या गंभीर असल्याने तातडीने पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.