पुणे : शहरातून सासवडला जात असलेल्या पीएमपी बसचा बोपदेव घाट उतरल्यानंतर अपघात झाला. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही बस रस्त्याशेजारील शेतात घुसली. यात बसमधील १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात रविवारी संध्याकाळी गराडे गावाजवळ झाला.
कात्रज आगारातून रविवारी प्रवाशांना घेऊन पीएमपी बस सासवडच्या दिशेने निघाली होती. यावेळी बोपदेव घाट उतरल्यावर पुढे सात-आठ किलोमीटर अंतरावर गराडे गावाजवळ बस आली असता, चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि प्रवाशांसह बस रस्त्याशेजारील शेतात घुसली. यावेळी बसमध्ये २५ ते ३० प्रवासी होते. त्यापैकी १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच, पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अपघात झालेल्या बसची पाहणी केली. जखमींना तत्काळ जवळील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तर उर्वरित प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करून देण्यात आली होती.