पुणे : पीएमपीच्या प्रवासी संख्येमधील घट सुरूच असून, मार्च २०१६ मध्ये प्रवासीसंख्या तब्बल ७० हजारांनी घटली आहे. एकीकडे प्रवासी संख्येच्या तुलनेत उपलब्ध गाड्यांची संख्या कमी असल्याने पीएमपी नव्या गाड्या ताफ्यात सहभागी करण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे प्रवासी संख्या चिंताजनक स्वरूपात घटत आहे. फेब्रुवारीत असलेली १० लाख ८० हजार प्रवासी संख्या मार्च महिन्यात १० लाख १० हजारांवर खाली आहे. एकाच महिन्यात प्रवाशांचा आकडा ७० हजाराने कमी झाल्याने नव्या गाड्यांचा काय उपयोग होणार, अशा प्रश्न पीएमपी प्रवासी मंचाने उपस्थित केला आहे.पीएमपीच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या २००९ ते २०१५ दरम्यान १० लाखांच्या आसपास राहिली आहे. मात्र, याच कालावधीत बसची संख्या १५११ वरून २०४५ वर गेली आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढूनही प्रवासी संख्येत तेवढ्या प्रमाणात वाढ होत नसल्याचे स्पष्ट होते. मात्र, तरीही आगामी निवडणुका समोर ठेवून राजकीय स्वार्थापोटी नव्या गाड्या खरेदीचा घाट घातला जात असल्याचा आरोप मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केला आहे.गेल्या सात वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ५०० बसची वाढ झाली आहे. मात्र, प्रतिबस प्रवासी संख्या आणि ताफ्यातील बसचा वापर कमी-कमी होत चालला आहे. २००९ मध्ये सुमारे ८०० प्रतिबस असलेली प्रतिबस प्रवासीसंख्या ६०० वर आली आहे. त्यामुळे बससाठी वाहनतळ, प्रवासी वाढ, सुरक्षितता, संचलनातील कार्यक्षमता, पीएमपीवर आर्थिक बोजा न टाकता मिनी बस व टप्प्या-टप्प्याने गरजेनुसार गाड्यांची वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रवासी मंचाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पीएमपी बस झाली प्रवाशांना नकोशी
By admin | Published: May 15, 2016 12:45 AM