पुणे: सकाळचे ९ वाजून ४० मिनिटे झाली होती. पीएमपीची मनपा ते साईनगर मार्गावर संचलनात असलेली बस वाडिया कॉलेजजवळ आली. बसच्या मागून दुचाकीवर येणाऱ्या राहुल वाघमारे नावाच्या पोलिस शिपायाने डावीकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्याचे काम चालू असल्याने त्याचा प्रयत्न हुकला आणि तो थोडक्यात बचावला. या गोष्टीचा मनात राग धरून वाघमारे यांनी बसचा पाठलाग करत बससमोर रस्त्यात दुचाकी उभी केली. प्रचंड रागाच्या भरात बसमध्ये चढून बसचालकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. बसचालकाने प्रतिकार न करता मारहाण का करतोस?, अशी विचारणा केली. तेव्हा ‘गाडी चौकीला घे’ असे सांगून धमकावण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. नागरिकांनी सोशल मीडियासारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर टीकेचा वर्षाव करत या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली, तर काहींनी पोलिसांच्या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पोलिसांना कायदा हातात घ्यायचा अधिकार दिला कुणी?
बसचालकाने ओव्हरटेक करू न दिल्यामुळे रागावलेल्या पोलिस शिपायाने बसचालकाला थांबवून मारहाण केली. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शिपायाने बस थांबवून चालकाला बेदम मारहाण केली आणि त्याला धमक्या दिल्या. या घटनेनंतर बसमधील प्रवासी घाबरून गेले. चुकी कुणाचीही असो, कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही मग पोलिस याला अपवाद आहेत का?, पोलिसांना हा अधिकार कुणी दिला?, असे प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केले.
माफी मागितली, दंडही भरला मात्र ‘घातक प्रवृत्ती’ चे काय?
बस चालक आणि पोलिस शिपाई पोलिस ठाण्यात पोहोचताच ठाण्यातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत घालून दिली. त्यानंतर पोलिस शिपाई राहुल वाघमारे याने बसचालकाची माफी मागून त्याच्या ट्रिपचे झालेले नुकसान म्हणजेच ३ हजार रुपये दंड भरला. मात्र ओव्हरटेक न करू देणे यासारख्या किरकोळ कारणावरून रागाच्या भरात असे कृत्य करावे या ‘घातक प्रवृत्ती’चे काय करायला हवे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलिसांच्या मानसिक तणावाकडे लक्ष देण्याची गरज
पोलिस कर्मचाऱ्यांना येत असलेल्या तणावाला संबोधित करण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज आहे. वरिष्ठ पातळीवरील अधिकारी ते सामान्य कर्मचाऱ्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण असणे महत्त्वाची भूमिका बजावते. त्यांच्यासाठी मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि विशेषत: पोलिसांच्या गरजेनुसार मानसिक कल्याण, पिअर सपोर्ट नेटवर्क, गोपनीय समुपदेशन सेवा आणि निरोगीपणा असे उपक्रम राबवले गेले पाहिजे. कुटुंबीयांना अथवा कामाच्या ठिकाणी असलेल्या सहकारी मित्रांना मानसिक तणाव किंवा नैराश्याची लक्षणे आढळून आल्यास त्यावर तत्काळ चर्चा केली पाहिजे. - भानुप्रताप बर्गे, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त
सकाळच्या घटनेनंतर पोलिसांनी आमची समजूत घालून पोलिस शिपायाने दंड भरला. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याचं गांभीर्य ओळखता वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा मला फोन आला, तुम्ही ठाण्यात या आपण हे प्रकरण मिटवू असे सांगून मला पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र, सकाळच्या घटनेनंतर माझी मानसिक स्थिती नसल्याने मी त्यांना उद्या येतो, असे सांगितले. - बसचालक, पीएमपी.