पुणे : कोरोना विषाणुची लागण होऊ नये म्हणून सर्वच यंत्रणा सर्व तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ही मागे राहिलेले नाही. पीएमपी कर्मचाऱ्यांनी कोणापुढेही हात न पसरता उपलब्ध साधनसामुग्रीतून बसमध्येच सॅनिटायझर यंत्रणा तयार केली आहे. बसमध्ये ये-जा करणारा प्रत्येक प्रवासी या सॅनिटायझर फवारणीतून गेल्यानंतर निजंर्तुक होईल, याची दक्षता घेण्यात आली. हे प्रायोगिक तत्वावर असून त्यात आवश्यकतेनुसार आणखी बदल केले जाणार आहेत.पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनापीएमपी कडून बससेवा पुरविली जात आहे. सध्या १०० हून अधिक बस मार्गावर धावत आहेत. दिवसभर मार्गावर धावलेल्या बस रात्री आगारामध्ये धुवून दुसऱ्या दिवशी पुन्हा मार्गावर आणल्या जातात. पण या बसमधून ये-जा करणारे प्रवासीही निजंर्तुक व्हायला हवेत, या भुमिकेतून कात्रज व कोथरूड आगारातील कर्मचाऱ्यांनी केवळ पाचशे रुपयांच्या खर्चात ही यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेतून दोन्ही दरवाज्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर सोडीयम हायपोक्लोराईडचा फवारा सोडला जातो. ही यंत्रणा चालु-बंद करण्याचे काम चालकाच्या हातात देण्यात आले आहे. बसच्या वायपरच्या मोटारीचा त्यासाठी आधार घेतला आहे, असे कात्रज आगाराचे अभियंता विकास जाधव यांनी सांगितले. कोथरुड आगारात एका बसमध्ये तर कात्रज आगारात दोन बसेसमध्ये प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा सुरू झाली आहे. पुढील काळात आणखी बसमध्ये सॅनिटायझर यंत्रणा बसविली जाणार आहे.पीएमपी अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा सुरू करण्यात आली असून यासाठी जाधव यांच्यासह कोथरूड आगाराचे व्यवस्थापक चंद्रकांत वरपे, कर्मचारी राजाभाऊ पायगुडे, सागर जाधव, संजय हगवणे, राजेश पवार,अरविंद दुपटे, सुनिल पाटोळे, पप्पू भोसले यांनी प्रयत्न केले.
पुण्यात पीएमपी बसमध्ये प्रवासी होणार निर्जंतुक ; कर्मचाऱ्यांची कल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 2:40 PM
पुढील काळात बसमध्ये सॅनिटायझर यंत्रणा बसवली जाणार...
ठळक मुद्देकाही बसमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरूवातदोन्ही दरवाज्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर सोडीयम हायपोक्लोराईडचा फवारा