धनकवडी : कात्रज चौकातील बस थांब्यावर थांबलेली बस विना चालक पुढे अचानक सुरु झाली. मात्र, ही बस इंडीका गाडीला धडकून थांबल्यामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. दुपारी बस थांब्यावर बस सुरूच ठेवून गेलेला चालक दिगंबर खोत याला पीएमपी प्रशासनाकडून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. शिवाजीनगरवरुन एक फेरी पूर्ण करून कात्रज स्थानकामध्ये आलेला चालक खोत पुन्हा शिवाजीनगरकडे जाण्यासाठी बसथांब्यावर आला होता. दुपारी साडेबारा वाजता त्याला पुन्हा शिवाजीनगरची फेरी करावयाची होती. जेवणाची वेळ असल्यामुळे चालक बस बंद न करता सुरू ठेवत जेवण करण्यासाठी निघून गेला. बस नुकतीच थांब्यावर आल्यामुळे बसमध्ये प्रवाशी नव्हते. बस सुरू असल्यामुळे उताराने पुढे जावू लागली. त्याचवेळी स्वारगेटकडे जाणारा सिग्नल सुटला. स्वारगेटसह बाह्यवळण मार्गाने नवले उड्डाणपुलाच्या दिशेने वाहने जावू लागली. उताराने येणारी बस एका इंडिका गाडीला धडकून थांबली आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेने कात्रजच्या चौकात एकच गोंधळ उडाला. वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. भेदरलेला इंडिका चालक गणेश माळी सुदैवाने बचावला. हिंजवडीकडे निघालेला गणेश सिग्नल मिळाल्यामुळे वळला आणि बस येवून आदळली. दरम्यान कात्रज आगार प्रमुख सतीश चव्हाण यांनी माहिती घेवून चालक खोत याला बेजबाबदारपणे बस सुरू ठेवून गेल्याबद्दल तत्काळ निलंबित केले.
कात्रज चौकात पीएमपी बस ‘विना चालक’ धावली पण...दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 5:47 PM
जेवणाची वेळ असल्यामुळे चालक बस बंद न करता सुरू ठेवत जेवण करण्यासाठी निघून गेला...
ठळक मुद्देबेजबाबदारपणे बस सुरू ठेवून गेल्याबद्दल चालक तत्काळ निलंबित