पुणे : कचऱ्यापासून निर्मिती करण्यात आलेला ‘बायो सीएनजी’ या गॅसवर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस धावणार आहेत. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून तयार झालेल्या गॅसचा वापर बससाठी करणारे पुणे हे जगातील दुसरे ठरणार आहे. यापुर्वी स्वीडनमध्ये हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. दि. २० ऑक्टोबरपासून पहिल्या टप्प्यात सुमारे ५० बस या इंधनावर धावणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली. शहरातील प्रदुषण कमी करणे तसेच इंधन खर्चात बचत करण्यासाठी मागील काही वर्षांपासून ‘पीएमपी’च्या ताफ्यामध्ये सीएनजीवर धावणाऱ्या बसला प्राधान्य दिले जात आहे. आता त्यापुढे जात पीएमपी प्रशासनाकडून बायो सीएनजीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचा तळेगाव येथे कचरा निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पात हॉटेलमधील खाद्य पदार्थ व कचऱ्यापासून गॅस तयार केला जातो. या गॅसचा वापर पीएमपीसाठी करण्याचा निर्णय चार-पाच वर्षांपूर्वीच झाला आहे. त्यानुसार चाचण्याही घेण्यात आल्या. आता प्रत्यक्ष मार्गावर सीएनजी बसमध्ये बायोसीएनजी इंधनाचा वापर केला जाणार आहे. निगडी येथे गॅस पंप सुरू केला जाणार असून तिथूनच तीन महिन्यानंतर बसमध्ये बायोसीएनजीचा पुरवठा केला जाईल. तर दि. २० ऑक्टोबर पासून पहिल्या टप्प्यात ५० बसमध्ये या इंधनाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी इंडियन ऑईल व एक खासगी संस्था सहकार्य करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.--------------शहरातील कचऱ्यापासून बायो सीएनजी निर्मिती करून त्याचा पुरवठा शहर बसला करणारे पुणे हे जगातील दुसरे शहर ठरणार आहे. पहिल्यांदा स्वीडनमध्ये हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.- राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
पुण्यात पीएमपी बस धावणार आता ‘बायो सीएनजी’वर; स्वीडनबाहेरील पहिले शहर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 11:48 AM
शहरातील कचऱ्यापासून बायो सीएनजी निर्मिती करून त्याचा पुरवठा शहर बसला करणारे पुणे हे जगातील दुसरे शहर ठरणार आहे.
ठळक मुद्देकचऱ्यापासून तयार होतोय गॅसया गॅसचा वापर पीएमपीसाठी करण्याचा निर्णय चार-पाच वर्षांपूर्वीच२० ऑक्टोबरपासून पहिल्या टप्प्यात सुमारे ५० बस ‘बायो सीएनजी’ या इंधनावर धावणार निगडीत गॅस पंप सुरू केला जाणार; तीन महिन्यानंतर तिथूनच बसमध्ये बायोसीएनजीचा पुरवठा