पुणे : कोरोना संकटामुळे मागील तीन महिन्यांपासून ठप्प असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बससेवेला पुण्यात सेवा सुरू करण्यासाठी लवकर मान्यता मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने उत्पन्न मिळवण्यासाठी बस भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी, शासकीय संस्थांसह औद्योगिक कंपन्या कर्मचारी ने-आण करण्यासाठी बस देण्यात येणार आहेत. लवकरच त्याचे नव्याने दर निश्चित केले जाणार आहेत.लॉकडाऊनमध्ये सध्या केवळ अत्यावश्यक सेवा व पिंपरी चिंचवड मध्ये बस सेवा सुरू आहे. मात्र या सेवेलाही अल्प प्रतिसाद मिळत आहे. परिणामी मागील तीन महिन्यात सुमारे १५० कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. कर्मचाºयांचे वेतन देणेही प्रशासनाला शक्य होत नाही. सध्या दोन्ही पालिकांकडून मिळणाºया निधींवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे प्रशासन काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाप्रमाणे माल वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रामुख्याने आयटी कंपन्यांना कर्मचारी वाहतुकीसाठी बस भाडे तत्वावर देण्याचे ठरविले. पण जादा दरामुळे काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आता दर कमी करून सर्वच संस्था, कंपन्यांना बस देण्याला संचालक मंडळाने नुकतीच तत्वत: मंजुरी दिली आहे. चाकण, हिंजवडी, भोसरी, चिंचवड यासह विविध भागांतील औद्योगिक कंपन्या, शासकीय व खासगी संस्था तसेच आयटी कंपन्याना लाँकडाऊन नियमावलीच्या अधीन राहून मासिक करारावर कंपनीचे कर्मचारी ने -आण करण्यासाठी बसेस देण्यात येणार आहेत. पूर्वी प्रतिमाह किमान दोन हजार किमी आकारणी आणि प्रतिकिमी ८३ रुपये ५० पैसे दराने बील आकारणी प्रमाणे बसेस देण्याचे नियोजन होते. परंतु हा दर जास्त असल्याने प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता महामंडळाचे उत्पन्न प्रतिकिमी जवळपास ५० रु असल्याने ५० ते ६० रुपये दराने बसेस भाड्याने देण्यात येणार आहेत. याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल, असे पीएमपी अधिकाºयांनी सांगितले.
कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेली पीएमपी बस मिळणार भाडेतत्वावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 5:14 PM