पुणे : महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार मुख्य मालकाकडील नियमित कामगारांप्रमाणे ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना पगार देणे आवश्यक आहे. परंतु, पीएमपी बसवर काम करणाऱ्या ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना अत्यल्प पगार मिळत आहे. त्यामुळे वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग स्वीकारला असून, प्रवाशांना मिळणाऱ्या सेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयासमोर ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या वेळी महाराष्ट्र कामगार मंचचे अध्यक्ष दिलीप मोहिते उपस्थित होते. तीन दिवसांपासून कोथरूडमधील सुमारे ८० कामगारांनी बंद पुकारला आहे. वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी वैतागले आहेत. प्रत्येक कंत्राटी कामगाराला पगार ४३० रुपये आणि भत्ता २० रुपये असे एकूण ४५० रुपये मिळणे गरजेचे आहे. तसेच प्रतितास ओव्हरटाइम ७० रुपये मिळायला हवा; परंतु सध्या यापेक्षा कमी पगार मिळत आहे. चालकांना आणि डेपोतील इतर कामगारांना आय.डी. प्रूफ मिळालेले नाही. चेकरने पकडले असता चालकांना स्वत:कडचे पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे याविरोधात चालकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.(प्रतिनिधी)
पीएमपी कंत्राटी कामगार संपावर
By admin | Published: July 29, 2014 3:20 AM