पुणे : पीएमपीएमएलकडून भाडे कराराने घेण्यात आलेल्या पाच ठेकेदारांच्या तब्बल ६५३ बसेसची थकीत देणी अद्याप पीएमपीने दिलेली नाहीत. त्यामुळे या ठेकेदारांनी पुन्हा आॅपरेशनल ब्रेकडाऊनचा पवित्रा घेतला असून, येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत थकीत देणी न मिळाल्यास बस पुन्हा बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबतचे पत्र, ठेकेदारांकडून पीएमपी प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून, थकीत देणी लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यात आली आहे. पीएमपीच्या ताफ्यातील बसेसची संख्या कमी असल्याने महालक्ष्मी आॅटोमोटिव्ह, ट्रॅव्हल टाईमकार, महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट,अँथोनी गॅरेज, बीव्हीजी इंडिया या कंपनीकडून ६५३ बसेस भाडे कराराने घेतल्या आहेत. या बसेसची तब्बल ६० कोटींची देणी पीएमपीने थकविल्याचा पवित्रा घेत या पाचही ठेकेदारांनी आपल्या बसेसचे संचलन १ आॅक्टोबर रोजी बंद केले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत थकबाकी देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र या आश्वासनानंतरही ठेकेदारांना पैसे मिळालेले नाहीत.पीएमपीने आम्हाला १५ आॅक्टोबरपर्यंत सर्व थकीत देण्याचे आश्वासन दिले होते. करारानुसार, त्यांनी आम्हाला दररोज भाडे देणे अपेक्षित होते. मात्र, तसे होत नाही. त्यांच्याकडून पालिकेचे कारण पुढे करून आमची बिले थकविली जात आहेत. त्यामुळे ३१ आॅक्टोबरनंतर पुन्हा आॅपरेशनल ब्रेकडाऊन झाल्यास त्यास पीएमपी जबाबदार असेल.- शैलेश काळकर ट्रॅव्हल टाईम कार रेंटल.प्रा.लिया शिवाय ब्रेकडाऊन झाल्यास त्यास पूर्णत: पीएमपी प्रशासन जबाबदार राहणार असून, बसेस बंद राहिल्यास करारानुसार, पीएमपीने आम्हाला प्रतीबस २०० रुपये देण्याची जबाबदारी असेल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पीएमपी ठेकेदारांचा पुन्हा संपाचा पवित्रा
By admin | Published: October 21, 2015 1:22 AM