पुणे : मद्यपान करून ‘धूम स्टाईल’ वाहन चालविणाऱ्यांची चालकांची दृश्य अनेकदा चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. पण अाज पुण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस प्रवाशांनीच हा धडकी भरविणारा अनुभव घेतला. मद्यधुंद चालकाने प्रवाशांनी भरलेली बस थेट गर्दीच्या रस्त्यावर चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. प्रवाशांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर चालकाला बस बाजूला घेण्यास सांगत पोलिसांच्या ताब्यात दिले.
चंद्रशेखर अहिरराव असे या बसचालकाचे नाव आहे. हा चालक खासगी ठेकेदाराकडील असून कोथरूड आगारात नियुक्तीला होता. रविवारी कात्रज-कोथरुड (मार्ग क्रमांक १०३) मार्गावर दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या चालकाची सकाळी सहा वाजता पहिली बस फेरी सुरू झाली. दोन फेऱ्या पुर्ण झाल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कात्रज येथून त्याची तिसरी फेरी होती. यावेळी बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. कात्रज येथून निघाल्यानंतर बस वेडीवाकडी चालु लागली. चालकाचे बसवर नियंत्रण नसल्याचे प्रवासी वाहकाच्या लक्षात आले. पण सुरूवातीला त्याच्याकडे कुणीही फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्याने बस तशीच पद्मावतीपर्यंत दामटत नेली.
चालकाचा बसवर अजिबात ताबा राहत नसल्याचे पाहिल्यानंतर प्रवाशांना तो मद्यधुंद असल्याचे लक्षात आले. मग मात्र प्रवाशांनी त्याला बस बाजूला घेण्यास सांगितले. पण त्याकडे दुर्लक्ष करून तो तशीच बस चालवित राहिला. अखेर वाहक व प्रवाशांनी त्याला बस बाजूला घेण्यास भाग पाडले. त्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांना बोलावून त्याला ताब्यात देण्यात आले. सुदैवाने तो बस चालवित असताना रस्त्यावरील वाहनांना धडक दिली नाही. त्यामुळे प्रवाशांनाही कसलीही इजा झाली नाही. प्रवाशांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.चालक बडतर्फमद्यधुंद चालक मागील चार-पाच महिन्यांपासून कोथरूड आगारात नियुक्तीला होता. रविवारी यादिवसाची त्याची शेवटची फेरी होती. भाजी आणायला जातो असे सांगून तो मद्यपान करून आला. आता त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. - विक्रम भंवर, सुपरवायझर, खासगी ठेकेदारभाजी आणालया गेला अन्...चंद्रशेखर अहिरराव याची रविवारी दुपारी १ वाजता कात्रज येथून शेवटची फेरी होती. त्यामुळे तो वाहकाला सांगून भाजी आणण्यासाठी गेला. तोपर्यंत तो सुस्थितीत होता. त्यानंतर त्याने बसच्या स्टेअरिंगचा ताबा घेतला. भाजी आणण्यासाठी गेला तेव्हाच त्याने मद्यप्राशन केले असावे, अशी शक्यता वाहकाने व्यक्त केली.