पुणे : पीएमपीच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी महापालिकेच्या पाच जकात नाक्यांच्या जागा पीएमपीला देण्याच्या निर्णयास पक्षनेत्यांच्या बैठकीत बुधवारी एकमताने मान्यता देण्यात आली. प्रत्येकी 11 महिन्यांच्या कराराने या जागा देण्यात येणार असून, त्यात शेवाळवाडी, भेकराईनगर, बालेवाडी, शिंदेवाडी आणि भूगाव येथील या जागा आहेत. या जागांची देखभाल-दुरुस्ती आणि त्या ठिकाणी कोणतेही अतिक्रमण होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी पीएमपी प्रशासनाची असणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी जकात रद्द झाल्यानंतर, महापालिकेच्या जकात नाक्यांच्या जागा रिकाम्या पडून आहेत. या जागांचा वापर खासगी वाहतूकदारांकडून केला जातो. तसेच, त्या ठिकाणी अतिक्रमणेही होऊ लागली आहे. त्यातच पीएमपीला वाहने पार्क करण्यासाठी जागा मिळत नसल्याने, ती रस्त्यावर पार्क करावी लागत असून, मागील महिन्यात एका बसची चोरीही झालेली आहे. तसेच, रस्त्यावर वाहने लावण्यात आल्याने डिझेलचोरीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे पीएमपीच्या बसेस पार्क करण्यासाठी जकात नाक्याची मागणी पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पालिकेच्या सातमधील या पाच जकात नाक्यांच्या जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास आज सर्वपक्षीय नेत्यांनी मान्यता दिल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले.
पीएमपीला अखेर मिळाले पार्किंग
By admin | Published: April 02, 2015 5:49 AM