पुणे : खास महिला प्रवाशांच्या सोयीसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या बससाठी राज्य शासनाकडून दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रकमेत किमान ५० बस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात दाखल होतील. पुण्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली आणि नागपूर या शहरांतील महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी सुरुवातीला ३०० बस आणि ५० कोटी रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती; मात्र शुक्रवारी काढण्यात आलेल्या शासन निर्णयात केवळ ३९ कोटी ९५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईसाठी ११ कोटी, पुण्यासाठी १० कोटी, नवी-मुंबईसाठी २.५० कोटी, ठाण्यासाठी ६ कोटी, कल्याण-डोंबिवलीसाठी १.२० कोटी आणि नागपूरसाठी ९.२५ कोटी रुपये, अशी विभागणी करण्यात आली आहे.पुण्यासाठी मिळालेल्या निधीतून किमान ५० बस खरेदी केल्या जाऊ शकतात. या सर्व बस महिला प्रवाशांसाठी गर्दीच्या वेळी सोडल्या जाणार आहे. निधी मंजूर झाल्याने आता लवकरच बसखरेदीची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे शहरातील महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या चार-पाच मार्गांवरच महिलांसाठी बससेवा सुरू आहे. दरम्यान, पुण्यातील नोकरदार व बसने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे किमान ७० ते ८० बस मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. सुरुवातीला सर्व शहरांसाठी ३०० बस देण्यात येणार होत्या; पण निधी कमी मंजूर करण्यात आला आहे. कदाचित पुढच्या टप्प्यात आणखी निधी दिला जाईल, असे पीएमपीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
तेजस्विनी बससाठी पीएमपीला १० कोटी
By admin | Published: March 26, 2017 2:12 AM