गणेशोत्सवात पीएमपीला मिळाले १५ कोटी ६३ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 07:13 PM2018-09-27T19:13:49+5:302018-09-27T19:17:49+5:30
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) ला गणेशोत्सवादरम्यान सुमारे १५ कोटी ६३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच या कालावधी बसने विनातिकीट प्रवास करणाºया १ हजार १७६ प्रवाशांकडून साडे तीन लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
पीएमपी प्रशासनाकडून गणेशोत्सवात दरवर्षी जादा बस सोडल्या जातात. यंदा १३ ते २३ सप्टेंबरदरम्यान दररोज नियमित बससेवे व्यतिरिक्त रात्रीच्या वेळी ६०० विशेष बसचे नियोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवादरम्यान उपनगरांसह राज्याच्या विविध भागातून गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी पुण्यात येतात. त्यांच्या सेवेसाठी स्वारगेट, मनपा, पुणे स्टेशन, कात्रज, माळवाडी अशा विविध ठिकाणांपासून बसची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. यातून पीएमपीला १५ कोटी ६३ लाख ३६ हजार २७० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच फुकट्या प्रवाशांवर नियंत्रण मिळविण्यासाठी गणेशखिंड, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सिंहगड रस्ता, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, बंडगार्डन, वानवडी कॉर्नर, वसंतबाग सातववाडी याठिकाणी तपासणी पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या १ हजार १७६ प्रवाशांकडून ३ लाख ५२ हजार ९०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
------------------