लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १० लाख प्रवाशांची लाईफ लाईन असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेला तरुणाईची अधिक पसंती मिळत आहे. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. एकूण प्रवाशांपैकी सुमारे ७१ टक्के प्रवासी १८ ते ३१ वयोगटातील असून आहेत. तसेच एकूण प्रवाशांमध्ये ६६ टक्के प्रवासी हे दररोज बसने प्रवास करणारे आहेत. तर उर्वरित प्रवासी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बसचा वापर करतात.‘पीएमपी’ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नोकरदार आणि विद्यार्थ्यांची संख्या सर्वात मोठी आहे. त्यातही महिलांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. जेनेसिस मॅनेजमेंट अँड मार्केट रिसर्च या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये विविध मुद्यांवर माहिती घेण्यात आली आहे. दि. १ ते ८ एप्रिल या कालावधीत शहराच्या विविध भागातील बस आगार व स्थानकांवर हे सर्वेक्षण झाले. यामध्ये ७१ टक्के प्रवासी हे तरुण असल्याचे आढळून आले. त्यांचा वयोगट १८ ते ३१ वर्षे हा होता. जवळपास निम्मे प्रवासी पासधारक असून इतर दररोज तिकीट काढून प्रवास करतात. त्यातही ३८ टक्के विद्यार्थी असून ४५ टक्के प्रवासी नोकरदार आहेत, तर उर्वरित १७ टक्के इतर प्रवासी असून ते दररोज बसने प्रवास करीत नाहीत. अनेक प्रवाशांनी मेट्रो आल्यानंतर त्याचा वापर करू, असे सांगितले.बसेसच्या अपुऱ्या संख्येमुळे एखाद्या बसमध्ये मोठी गर्दी होते. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. तसेच बसेसची अवस्थाही चांगली नसल्याने प्रवाशांना मनस्तापही सहन करावा लागतो. सुरक्षितता, बसेसची जागा संख्येबाबत प्रवासी आग्रही असल्याचे सर्वेक्षणात आढळून आल्याची माहिती ‘जेनेसिस’चे व्यवस्थापकीय संचालक अनिल धनेश्वर यांनी दिली.दुपारी १२ ते ८ या वेळेत ७४ टक्के प्रवासी बसने प्रवास करतात. साधारणपणे या वेळेतच बसेसला अधिक गर्दी दिसून आली. बसने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ६६ टक्के आहे. याचा अर्थ सुमारे ९ ते १० लाख प्रवाशांपैकी सुमारे ६ लाख प्रवासी दररोज बसचाच पर्याय निवडतात, तर उर्वरित प्रवासी आठवड्यातून एक-दोन दिवसच बसला प्राधान्य देतात.
‘पीएमपी’ला मिळतेय तरुणाईची साथ
By admin | Published: May 08, 2017 3:13 AM