लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने ३५ कोटींपैकी १२ कोटी रुपये बुधवारी पीएमपी प्रशासनाला दिले. त्यामुळे गुरुवारी एमएनजीएलकडून जी कारवाई होणार होती. ती अखेर टळली आहे. मात्र, जो पर्यंत पूर्ण रक्कम दिली जाणार नाही. तोपर्यंत पीएमपीच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात जवळपास १६०० बसेस ज्या सीएनजी इंधनावर धावतात. सध्या यातील ७५० बसेस रस्तावर धावत आहेत. पीएमपीला महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)कडून सीएनजीचा पुरवठा होतो. लॉकडाऊनमुळे पीएमपीची प्रवासी वाहतूक बंद होती. याचा मोठा फटका पीएमपीला बसला. उत्पन्न नसल्याने एमएनजीएलची बिलापोटची थकीत रक्कम वाढत गेली. पीएमपी जवळपास ४९ कोटी रुपये एमएनजीएल देणे लागते.
त्यामुळे एमएनजीएलने वारंवार नोटीस देऊन थकीत रक्कम तात्काळ भरावी, असे सांगितले होते. अन्यथा गुरुवारपासून पुरवठा बंद करू असे म्हटले होते. मात्र ही कारवाई अखेर टळली आहे. पिपरी-चिंचवड महापालिका पीएमपीला आणखी २३ कोटी रुपये देणे बाकी आहे.
कोट :
पीएमपीला सीएनजीने गुरुवारपासून सीएनजीचा पुरवठा बंद करू अशी नोटीस दिली होती. आपल्या स्वामित्व हिश्यानुसार पिपरी-चिंचवड महापालिका पीएमपीला ३५ कोटी देणे बाकी होती. पैकी १२ कोटी बुधवारी दिले. ती रक्कम एमएनजीएलला देऊन गुरुवारची कारवाई टाळण्यात आली आहे.
- डॉ राजेंद्र जगताप, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक
पीएमपीएमएल, पुणे.