पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसला पार्किंगच्या जागेसाठी अजूनही हात पसरावे लागत आहेत. पार्किंगसाठी आवश्यक जागा मिळत नसल्याने दररोज शेकडो बस रस्त्यावरच उभ्या कराव्या लागत आहेत. काही आगारांच्या परिसरात तर दिवसाही बस रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा ठरत असून अनेकदा वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागत आहे.शहरात वाहनांच्या पार्किंगचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर असतो. दिवसेंदिवस खासगी दुचाकी व चारचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने ही स्थिती आणखीच गंभीर होऊ लागली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही सारखीच स्थिती आहे. इमारतींचे बांधकाम करताना पार्किंगसाठी आवश्यक जागा न सोडल्याने वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहे. ‘पीएमपी’ बसेसचीही हीच स्थिती आहे. पीएमपीचे सध्या ठिकठिकाणी १३ आगार असून सुमारे १४०० ते १५०० बस दररोज मार्गावर असतात. या बस मार्गावर नसताना उभ्या करण्यासाठी पीएमपीकडे आवश्यक जागा उपलब्ध नाही. त्यामध्ये पीएमपीच्या मालकीच्या बससह ठेकेदारांकडील बसेसचाही समावेश आहे. पुरेशी जागा नसल्याने शेकडो बस रस्त्यावर उभ्या करण्याशिवाय पर्याय नाही.मनपा, स्वारगेट, कात्रज या भागात दिवसाही काही बसेस तर मुख्य रस्त्याच्या कडेला उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे अनेकदा वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. तसेच अनेकदा बसमधील सुट्टे भाग, डिझेल चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. हडपसर, मार्केट यार्ड तसेच पिंपरी चिंचवडमधील आगारांना पार्किंगची समस्या फारशी जाणवत नाही.रात्रीच्या वेळी आगारासमोरच पार्किंगशहरामध्ये प्रामुख्याने पुणे स्टेशन, स्वारगेट, न. ता. वाडी, कात्रज यांसह अन्य काही आगारांमधील बसेसना पार्किंगसाठी जागा नाही.रात्रीच्या वेळी स्वारगेट आगाराच्या बस समोरील प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजुला तसेच लगतच्या इतर रस्त्यांवर उभ्या कराव्या लागतात. तर न. ता. वाडी आगाराच्या बस मनपा व डेक्कन बसस्थानक परिसरात पार्किंग करणे भाग पडते.कात्रज आगाराचीही हीच स्थिती असून लगतच्या रस्त्यांवर बस पार्किंग करण्याशिवाय पर्याय नाही. पुणे स्टेशन आगाराला तर पार्किंगसाठी काहीच जागा उपलब्ध नसल्याने सर्वच्या सर्व बस रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात.
पीएमपीला मिळेना पार्किंगसाठी जागा; दोन्ही पालिकांकडे जागांची यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 6:13 AM