पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील ४० मार्गांपेक्षा अधिक मार्गांवरील सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी एसटी महामंडळाच्या पुणे विभागाला एसटीची सेवा सुरू करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. एसटी सेवा नियमित झाल्यावर पीएमपी सेवा बंद होणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीत पीमपीकडून १२९० बस चालवण्यात येतात. शहराबाहेर पीएमपीचे १०४ मार्ग सुरू आहेत. दररोज १० ते १२ लाख प्रवासी पीएमपीतून प्रवास करतात. शहरातील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद बघता ही सेवा अपुरी पडत असल्याची ओरड अनेक दिवसांपासून होत आहे. कोरोना काळात आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांच्या मागणीवरून ग्रामीण भागात पीएमपीची सेवा सुरू करण्यात आली होती. आता सगळे पूर्ववत झाल्याने पुणेकरांच्या सुरळीत प्रवासासाठी हा निर्णय घेणे गरजेचे होते.'
तसेच ग्रामीण भागात पीएमपी तोट्यात चालत होती. हेदेखील या मार्गावरील पीएमपी सेवा बंद करण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे पीएमपीचे विद्यमान अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी एसटी महामंडळाला पत्र पाठवून सध्या ‘पीएमपी’च्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या मार्गांवर एसटी सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे. तसेच ‘पीएमपी’ प्रशासनाला या मार्गावरील बससेवा तत्काळ बंद न करता टप्प्याटप्प्याने कमी करण्याची सूचना दिली आहे. एसटी बस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या मार्गांवरील पीएमपी बससेवा बंद करण्यात येणार आहे.
''ग्रामीण भागात एसटीची सेवा देण्यासंदर्भात माझे एसटीच्या अधिकाऱ्यांची बोलणे झाले आहे. त्यांची सेवा सुरळीत सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने आम्ही पीएमपीची ग्रामीण भागातील सेवा बंद करणार आहोत. - ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपी''