पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) गेल्या ४ वर्षांत केवळ ३९ बसशेड उभारले असल्याची माहिती उजेडात आली आहे. शहरात अनेक ठिकाणी बसथांबे नसल्याने तसेच त्यांची अवस्था वाईट असल्याने नागरिकांना उन्हाळा, पावसाळा या ऋतूमध्ये मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम व्हावी म्हणून पीएमटी आणि पीसीएमटी यांचे एकत्रीकरण करून महामंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र महामंडळ होऊनही पीएमपीचा कारभार काही सुधारला नाही. पीएमपीचा तोटा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे पीएमपीचे पूर्ण दुर्लक्ष झाले असल्याचे माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीतून निष्पन्न झाले आहे.शहरातील बसशेडची खूपच दुरवस्था असल्याने पीएमपीने २०१० ते २०१४ या वर्षात किती बसशेड उभारले याची माहिती विचारण्यात आली होती. त्यामध्ये २०१० ते २०१३ या ३ वर्षांत पीएमपीने बसशेड उभारले नाहीत. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपाचे खासदार प्रकाश जावडेकर यांच्या निधीमधून २० बसशेड उभारण्यात आले. तसेच आमदार भीमराव तापकीर, मोहन जोशी, गिरीश बापट यांच्या आमदार निधीतून १९ बसशेड उभारण्यात आले आहे. खासदार व आमदार यांच्या निधीतून २०१४ मध्ये उभारण्यात आलेले ३९ बसशेड वगळता ४ वर्षांत पीएमपीकडून एकही बसशेड उभारण्यात आलेला नाही.४पीएमपीच्या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात जाहिराती लावल्याचे दिसून येते, मात्र पीएमपीला या जाहिरातींमधून अत्यल्प उत्पन्न मिळत आहे. २०१०-११ मध्ये ३ कोटी ६७ लाख, २०११-१२ मध्ये ४ कोटी ३० लाख, २०१२-१३ मध्ये ६ कोटी ८४ लाख, २०१३-१४ मध्ये १० कोटी ३० लाख इतकेच उत्पन्न मिळाले आहे. वस्तुत: बेस्टशी तुलना करता पीएमपीला या जाहिरातीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळविता येणे शक्य आहे.
पीएमपीने ४ वर्षांत बांधले अवघे ३९ बसशेड
By admin | Published: April 15, 2015 12:50 AM