पुणे: गेल्या दीड महिन्या पासून सामान्यासाठी खंडित झालेली पीएमपीची बससेवा रविवार पासून पुन्हा सुरू करण्यात आली. रविवारी पहिल्या दिवशी दोन्ही सत्रांत जवळपास ५० हजार पुणेकरांनी पीएमपीचा प्रवास केला. पीएमपी प्रशासनाच्या पहिल्या दिवशी १७९ मार्गावर एकूण ४१६ बसेस धावल्या. यातून जवळपास ५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. पीएमपीची बस सेवा सुरु झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे महापालिका व पिपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी शनिवारी पीएमपीला बस सेवा सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र बस मध्ये ५० टक्के प्रवासी क्षमता असावी तसेच कोरोना विषयक नियमांचे पालन व्हावे असे सांगितले. त्यानुसार पीएमपीएमएल प्रशासनाने रविवार पासूनच आपल्या १३ डेपोतून बस गाडया बाहेर काढून प्रवासी सेवेला सुरुवात केली. आपल्या एकूण क्षमतेच्या २५ टक्के गाडया रस्त्यावर आणल्या आहेत.
प्रवाशांचा प्रतिसाद पाहून गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येईल. रोज जवळपास ३०० मार्गावर पीएमपीचे २२०० बसेस धावतात. पहिल्या टप्यात १७९ मार्गावर ४१६ गाडया सुरू करण्यात आल्या आहे. सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत गाडया धावल्या. बस मध्ये एका सीटवर एक प्रवासी अशी रचना केली होती. तसेच गाडया निर्जंतुकीकरण करून सोडण्यात आल्या. बस मध्ये देखील सॅनिटायझरची सोय करण्यात आली होती. प्रवाशांना मास्क लावणे अनिवार्य केले होते.