पुणे : पीएमपीच्या प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळावी, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, जास्तीत जास्त बसेस संचलनात रहाव्यात या हेतून नवीन पीएमपी अध्यक्ष काम करत आहेत. पीएमपी कर्मचाऱ्यांनी कामात कसूर करू नये, त्याबरोबर प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी, तसेच काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी आणि कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीच्या प्रमाणास आळा बसावा या दृष्टीने पीएमपीचे नुतन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी एकाच दिवसात ३६ कर्मचाऱ्यांचे निलंबन तर १४२ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र आणि तिघांवर बडतर्फीची कारवाई केली.
पीएमपीच्या एकूण १५ डेपोंमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ३६ कर्मचाऱ्यांवर त्यांचे मागील रेकॉर्ड खराब असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये ३० वाहक आणि ६ चालकांचा समावेश आहे. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता (२२ जुलै) रोजी गैरहजर राहिलेल्या १४२ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यामध्ये ७८ वाहक व ६४ चालकांचा समावेश आहे. याबरोबरच २ चालक व वर्कशॉप विभागाकडील एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई देखील करण्यात आली.
प्रवाशांना उत्तम सेवा मिळावी या उद्देशाने पीएमपी अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी ‘प्रवासी दिन’, डेपो निहाय पालक-अधिकारी अशा उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत प्रवासी त्यांच्या अडचणी, तक्रारी, सूचना जवळच्या डेपोमध्ये, पास केंद्रावर किंवा बस स्थानकांवर जाऊन नोंदवू शकतात. तसेच सर्व डेपोंसाठी डेपो निहाय पालक अधिकारी नेमलेले असून हे पालक अधिकारी प्रत्येक शनिवारी पहाटे ५ ते ८ वाजेपर्यंत डेपोमध्ये स्वत: पाहणी करून प्रवाशांना चांगली सेवा मिळावी. यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करतात व त्यानंतर सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत गर्दीच्या मार्गांवर स्वतः बसमध्ये प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधतात असा या उपक्रमाचा अभिनव भाग आहे. त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होवू नये व त्यांना सौजन्यपूर्ण सेवा मिळावी या हेतूने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.