पुणे : पीएमपीचे माजी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांमध्ये शैथिल्य आल्याचे दिसून आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी मंगळवारी मध्यरात्री स्वारगेट व मार्केट यार्ड या डेपोला अचानक भेट दिली. या वेळी मार्केट यार्ड येथील डेपोमध्ये चार कर्मचारी कामावर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती गुंडे यांनी दिली. त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.गुंडे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रात्री पहिल्यांदाच डेपोला भेट दिली. या वेळी त्यांना अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. यासंबंधी डेपो मॅनेजरला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी डेपोतील कामकाज रात्री चालविण्यात यावे, असे आदेश दिले होते. दिवसभर रस्त्यावर बस चालल्यानंतर रात्री बसची दुरुस्ती करावी, असा यामागचा उद्देश होता. मात्र, अनेक वेळा रात्रपाळीस कर्मचारी कामावर गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी पीएमपी प्रशासनाकडे आल्या होत्या.मार्केट यार्ड येथे ४ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. स्वारगेट डेपोतील अहवाल मागविण्यात आला असून, तेथेसुद्धा काही कर्मचारी कामावर गैरहजर होते का, यासंंबंधी चौकशी करण्यात येत असल्याचेही गुंडे यांनी सांगितले.नयना गुंडे म्हणाल्या, रात्री डेपोत बसेसची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. हे काम कशा प्रकारे चालते ते पाहण्यासाठी अचानकपणे स्वारगेट व मार्केट यार्ड डेपोला भेट दिली. या वेळी काही कर्मचारी गैरहजर दिसून आले. त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असून, डेपो मॅनेजरला यासंबंधात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. या डेपोत अनेक ठिकाणी कचरा दिसून आला आहे. हा साफ करण्यासाठी सांगण्यात आला आहे. तसेच मार्गावर येणाºया बससुद्धा साफ येत नसल्याच्या अनेक तक्रारी पीएमपी प्रशासनाकडे आल्या आहेत. यासंबंधीसुद्धा डेपो मॅनेजरला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अनेक बसमधील आयटीएमस प्रणाली बंद असल्याचे दिसून आले आहे. ही प्रणाली बंद असल्याने बसची माहिती मिळत नाही. यामुळे बसमधील ही प्रणाली लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशीही सूचना डेपो मॅनेजरला देण्यात आली असल्याचे गुंडे यांनी सांगितले.
पीएमपी अध्यक्षांची डेपोला मध्यरात्री भेट, चार कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 3:18 AM