पुणे : तोट्याच्या गर्तेत असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडसाठी (पीएमपीएमएल) नवीन वर्षाचा पहिलाच आठवडा नव्या विक्रमाला गवसणी घालणारा ठरला आहे. सोमवारी (दि. ४) रोजी पीएमपीला एकाच दिवशी तब्बल २ कोटी ६ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. पीएमपीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एका दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या महिन्यात पासधारकांची संख्याही जवळपास दुपटीने वाढली असल्याने बसने प्रवास करणा-यांचा आकडाही वाढला असल्याचे या वरून दिसून येत आहे. तीन महिन्यांपूर्वी पीएमपीला सर्वाधिक १ कोटी ९३ लाख रूपयांचे उत्पन्न एकाच दिवशी मिळाले होते. त्यानंतर हा आकडा सर्वाधिक असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीकडून उत्पन्न वाढीसाठी विशेष उपाय योजना राबविल्या जात आहे. त्या अंतर्गत, मार्गांची फेररचना, वाहतूकीसाठी जादा बस उतरविणे, तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर करणे अशा घटकांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिवाळी, नाताळ, तसेच नवीन वर्ष आणि इतर सणांच्या सलग सुटटया असल्याने पीएमपीचे उत्पन्न घटले होते. मात्र, नवे वर्ष सुरू होताच पीएमपीच्या उत्पन्नाने सोमवारी विक्रमी आकडा गाठला आहे. या दिवशी पीएमपीला तिकिट विक्रीतून १ कोटी ३६ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले असून पासपोटी तब्बल ६९ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर तिकिट विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नात पिंपरी-चिंचवड शहराच्या हददीतून ५४ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या दिवशी पीएमपी कडून तब्बल १५५२ बसेस रस्त्यावर उतरविण्यात आल्या होत्या. त्यात जवळपास ७७७ बसेस पीएमपीच्या ताफ्यातील तर सुमारे ७४० बसेस या खासगी ठेकेदारांच्या असल्याचे कृष्णा यांनी सांगितले. ही बाब तोटयात असलेल्या पीएमपीसाठी आशादायक असून भविष्यात उत्पन्नाची ही वाढ कायम ठेवण्यासाठी उपाय योजना राबविण्यात येणार असल्याचेही कृष्णा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
नव्या वर्षात पीएमपीचा विक्रम
By admin | Published: January 06, 2016 12:35 AM