पुणे : पीएमपीसाठीच्या बसेसच्या टायर रिमोल्डींगचे काम करणा-या ठेकेदा़राला लाच मागितल्या प्रकरणी अटक झालेल्या पीएमपीचे स्वारगेट डेपोमधील भांडारपाल रमेश चव्हाण यांना पीएमपी प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. चव्हाण यांना प्रत्यक्ष लाच घेताना अटक झाली नसल्याने त्यांना निलंबित करता येणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आले असल्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. चव्हाण हे पीएमपीच्या स्वागेट डेपो मध्ये भांडारपाल आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते रजेवर आहेत. पीएमपीचे टायर रिमोल्डींग करणा-या एका ठेकेदाराचे तब्बल १५ ते २० लाखाचे बील जानेवारी २०१५ पासून थकले आहे. हे बील काढून देण्यासाठी चव्हाण यांनी संबधित ठेकेदाराकडे लाचेची मागणी केली होती. त्याची तक्रार या ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार, लाचलुचपत विभागाने या प्रकाराची चौकशी केली असता, चव्हाण यांनी थेट लाच न मागता, पीएमपीच्या एका वरिष्ट अधिका-याच्या घराचे फर्निचर काम सुरू असून थकलेली बिले हवी असतील तर, या फर्निचरच्या कामाची ८० हजारांची बिलाची रक्कम देण्याची मागणी ठेकेदाराने चव्हाण यांच्याकडे केली होती. या प्रकरणी चव्हाण यांना प्रत्यक्ष लाच घेताना अटक झालेली नाही. तसेच पोलिसांकडून पीएमपीला चव्हाण यांचे चार्टशिट दिलेले नाही, असे कृष्णा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पीएमपी भांडारपालास नोटीस
By admin | Published: October 23, 2015 3:27 AM