पुणे : टाकाऊ कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे पालिकेचे प्रकल्प काही प्रभागांमध्ये सुरूच आहेत; मात्र आता पालिका त्यापुढचे पाऊल टाकत असून, लवकरच या गॅसवर पीएमपीएलच्या गाड्या पळताना दिसतील. असे इंधन वापरण्याबाबतच्या काही परवानग्या मिळवण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न सुरू असून, त्यात यश मिळाले की ही गोष्ट प्रत्यक्षात येईल.आयुक्त कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. शहरात रोज कित्येक टन कचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने काही प्रभागात त्यापासून गॅस, वीज, खत निर्माण करणारे प्रकल्प सुरू केले आहेत. खासगीकरणातून सुरू असलेले यातील बहुतेक प्रकल्प लहान क्षमतेचे आहेत. मात्र, आता पालिकेने तळेगाव दाभाडे येथे रोज ३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प खासगीकरणातून उभारला आहे. पालिकेने ठेकेदाराला त्यासाठी १५ गुंठे जागा दिली असून, प्रक्रिया करणारे यंत्र, कामगार आदी गोष्टी ठेकेदाराच्या आहेत.शहरातील कचरा एकत्रित करून बाणेर येथे पालिकेच्या जागेवर आणतात. तिथेच सर्व कचरा क्रश केला जातो. बाणेरहून हा कचरा ठेकेदार तळेगाव येथील प्रकल्पात घेऊन येतो. ती जबाबदारी त्याच्यावरच आहे. त्यामुळे पालिकेचे वाहतुकीचा खर्च वाचला आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करून गॅस तयार केला जातो.हा गॅस वाहनांसाठी इंधन म्हणून वापरण्याला केंद्र सरकारच्या काही विभागांची परवानगी लागते. ठेकेदाराला ती मिळवून देण्यासाठी पालिकाही प्रयत्नशील आहे. अशी परवानगी मिळाली की प्रकल्पात तयार होणारा गॅस पीएमपीएलच्या गाड्यांसाठी वापरला जाईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी दिली.
कचऱ्याच्या गॅसवर पळणार ‘पीएमपी’
By admin | Published: May 15, 2016 12:50 AM