पुणे : पीएमपी प्रशासनाकडून गणेशोत्सव काळात गणेशभक्तांसाठी जादा ६४० बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रात्री १० नंतर दैनंदिन बस गाड्यांचे संचलन बंद होऊन स्पेशल गाड्या म्हणून पीएमपीची सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्री प्रवास करताना प्रवाशांना नियमित तिकीट दरापेक्षा ५ रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. तसेच रात्रीच्या वेळी या स्पेशल बसच्या सेवेमध्ये पीएमपीचा कोणताही पास चालणार नाही, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले. तसेच गणेश आगमन ते विसर्जन याकालावधीमध्ये (दि.१९ ते २८) या काळात पीएमपी प्रशासनाने पर्यायी उपलब्ध मार्ग सुरू केले आहेत. यावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पीएमपी प्रसाशनाकडून करण्यात आले आहे.
शिवाजी रस्त्याने येण्यास प्रतिबंध केल्यानंतर जंगली महाराज रोड, बालगंधर्व, डेक्कन, संभाजी पूलमार्गे टिळक रोडने स्वारगेट चौकात येऊन पुढे नेहमीच्या मार्गाने जातील.- टिळक रोड वाहतुकीस बंद झाल्यानंतर या मार्गाच्या बसेस शास्त्री रोडने दांडेकर पूल येथे येऊन पुढे मित्र मंडळ चौकमार्गे लक्ष्मीनारायण चौकात येऊन नेहमीच्या मार्गाने मार्गस्थ होतील.
- स्वारगेटहून शिवाजीनगरकडे जाताना बाजीराव रोडवरील वाहतुकीस प्रतिबंध होईपर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.- (बसमार्ग रस्ते बंदच्या काळात बंद ठेवण्यात येणार आहेत.)
- रस्ता बंद काळात शनिपार, मंडई ऐवजी नटराज स्थानकावरून सोडण्यात येतील. तसेच सदरच्या बस जाता-येता नेहमीच्या मार्गाने म्हणजेच अंबिल ओढा कॉलनी, सेनादत्त पोलिस चौकी मार्गे सुरू राहतील.